केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात १४ टक्के तर माल वाहतुकीच्या भाडय़ात साडेसहा टक्के वाढ केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी काँग्रेसतर्फे मनमाड व नाशिकरोड येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपप्रणीत केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात प्रचंड वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांवर प्रचंड आर्थिक बोजा पडणार आहे. यामुळे महागाईत वाढ होऊन सामान्य नागरिक भरडला जाईल. या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे. या बाबतची माहिती जिल्हा काँग्रेस प्रवक्ते प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी दिली. बुधवारी सकाळी नऊ वाजता मनमाड रेल्वे जंक्शन, दहा वाजता नाशिकरोड रेल्वे स्थानक तर साडेदहा वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकात हे आंदोलन केले जाणार आहे.