रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी आज आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्’ाात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा डोस न दिल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गेली काही वष्रे केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अजूनपर्यंत खासदार निलेश यांच्या प्रचारामध्ये भाग घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना प्रचाराच्या कामाला लावण्याच्या हेतूने राणे यांनी रत्नागिरी आणि कणकवली येथे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सभा आयोजित केल्या. त्यापैकी कणकवलीच्या सभेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांच्यासह कोणीही प्रमुख पदाधिकारी या सभेकडे फिरकले नाहीत. तसेच ‘पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वानी आघाडीचा धर्म पाळावा’ असे मोघम आवाहन करण्यापलिकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या जाहीर किंवा अनौपचारिक भेटीत सूचना केल्या नाहीत. रत्नागिरी शहरातील सभेत तर अजितदादांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि शिवसेनेवर टीका करण्यापलिकडे आघाडीतील बिघाडीबाबत काहीही टिप्पणी केली नाही. त्यामुळे मतदारसंघातील रुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी मनोमिलन घडून येण्याच्या दृष्टीने या दौऱ्याचा फारसा काहीच उपयोग न झाल्याची भावना कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे.
केसरकर-पवार भेट
दरम्यान सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा असंतोष संघटित केलेले आमदार दीपक केसरकर यांनी आज पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पवार यांनी त्यांना अपेक्षेनुसार खासदार निलेश यांच्या प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले. पण केसरकर यांनी कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याचे समजते.
या संदर्भात उद्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक केसरकर घेणार असून त्यानंतर अंतिम निर्णय केला जाईल, असा अंदाज आहे.