सुशीलकुमार शिंदे यांचा करिश्मा संपुष्टात

एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा वर्षांनुवर्षे प्रभाव राहिलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. लोकसभेच्या सोलापूर आणि माढा या प्रतिष्ठेच्या जागा भाजपने सहजपणे जिंकल्यानंतर शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे जिल्ह्य़ातील राजकारण अडचणीत आले आहे. तर गेली दहा वर्षे मागे राहिलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपच्या मदतीने प्रथमच आक्रमक भूमिका घेत पवार यांच्याशी दोन हात केले आणि गतवैभव प्राप्त करण्याइतपत कर्तृत्व सिद्ध केले आहे. या राजकारणात शिंदे यांचा करिष्मा संपल्यात जमा आहे, तर गेली अनेक वर्षे ‘पवार बोले, सोलापूर हले’ असा जो बोलबाला होता, त्याला मोठा तडा गेल्याचे दिसून येते. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

काँग्रेसचे वजनदार नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव त्यांच्या आणि पर्यायाने काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. २०१४ सालची लोकसभा निवडणूक ही आपली शेवटची म्हणून असे जाहीर केले होते. परंतु त्यावेळी मोदी लाटेत त्यांना अतिशय मानहानीकारक पराभव पत्कारावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यासाठी यंदा त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली. वयाच्या ७८व्या वर्षी लोकसभा निवडणूक लढविताना शिंदे यांनी, ही आपली शेवटचीच निवडणूक असल्याची भावनिक साद मतदारांना घातली खरी; परंतु मागील पराभवापेक्षा यंदाचा दुसरा पराभव त्यांच्यासाठी अधिक धक्कादायक ठरला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली तेव्हा शिंदे यांना एक नव्हे दोन आव्हानांना तोंड द्यावे लागले. तिसऱ्या क्रमांकाची एक लाख ७० हजार मते घेताना आंबेडकरांनी शिंदे यांना विजयापासून ‘वंचित’ ठेवले. शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसला आपली बूज राखता आली नाही. येथे भाजपने ३० हजार ८३० मतांची आघाडी मिळविली.

आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करताना अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्य हे दोन्ही काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघात भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागणार आहे. तर अक्कलकोटमधून चार वेळा आमदार झालेले काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचेही राजकीय भवितव्य संकटात असल्याचे मानले जात आहे. त्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके हेही दोलायमान मनस्थितीत असल्याचे सांगितले जाते.

पवार- मोहिते पाटील लढत

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यातील लढतीत निंबाळकर यांनी बाजी मारली असली तरी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्यापासून दुरावत भाजपच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यातच खरी लढत झाल्याचे दिसते. गेली दहा वर्षे जिल्ह्य़ात पवार-मोहिते यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. त्यात पवार गटाने माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू संजय शिंदे यांना मोहिते-पाटील यांच्या विरोधात भूमिका घेण्यास नेहमीच मोकळीक दिली होती. त्यातून मोहिते-पाटील यांची वरचेवर मानहानी करण्याची संधी शिंदे बंधूंनी साधली होती. अखेर लोकसभा निवडणुकीत पवार-मोहिते शीतयुद्धाला तोंड फुटले आणि मोहिते-पाटील गटाने पवार यांच्याशी फारकत घेऊन थेट भाजपचा मार्ग पत्करला.

माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी माढा, माळशिरस, फलटण हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली तर माणमध्ये काँग्रेस, सांगोल्यात शेकाप आणि करमाळ्यात शिवसेना असे राजकीय बलाबल आहे. परंतु लोकसभा निकालामुळे माळशिरसमध्ये मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपल्यात जमा आहे. तर माढय़ासारख्या राष्ट्रवादीच्या गंडस्थळावरही भाजप अर्थात मोहिते-पाटील गट घाव घालण्याची शक्यता वर्तविली जाते. करमाळ्यात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे मुळातच मोहिते-पाटील गटाचे आहेत. तेथे लोकसभा लढती वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि स्थानिक नेत्या रश्मी बागल यांच्यात समझोता झाल्याने त्यांना ३० हजारांची मतांची आघाडी घेता आली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी कोण उमेदवार असेल, यावर राजकीय भवितव्य अवलंबून आहे. सांगोल्यातही शेकापसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. माणमध्ये काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या बाजूनेच खटपट केल्यामुळे तेथे भाजपचा जोर वाढू शकतो. तर फलटणमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे भवितव्यही धोक्यात आले आहे.

मोहिते पाटील यांचे वजन वाढले

खरे तर १९९९ पासून म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून विजयसिंह मोहिते-पाटील यांना कधीही राजकारण गांभीर्याने करता आले नव्हते. राष्ट्रवादीपासून दुरावल्यानंतर  २० वर्षांत प्रथमच त्यांनी गांभीर्यपूर्वक राजकारण केले. त्यात त्यांची सरशी झाली. त्यांनी माढय़ावर मिळविलेल्या वर्चस्वामुळे भाजपमध्ये त्यांचे राजकीय वजन वाढण्यास मदत झाली आहे.