News Flash

“ये डर अच्छा है”; यशोमती ठाकूरांचा भाजपाला खोचक टोला!

राहुल गांधींनी एकीकडे केंद्र सरकारवर आणि भाजपावर सातत्याने टीका सुरू ठेेवली असताना आता यशोमती ठाकूर यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.

यशोमती ठाकूर यांचा भाजपाला ट्वीटमधून टोला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नावाने नेहमीच दोन्ही पक्षांतील नेते, कार्यकर्ते आरोप-प्रत्यारोप करत असतात. विशेषत: भाजपाकडून राहुल गांधींना वारंवार लक्ष्य केलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये करोना आणि त्यापाठोपाठ देशात निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती यावरून राहुल गांधींनी सातत्याने केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अमरावतीमधील नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. आपल्या ट्वीटर हँडलवरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

 

राहुल गांधींचा प्रभाव नाकारता नाकारता…!

यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये भाजपा राहुल गांधींना घाबरत असल्याचा उल्लेख केला आहे. हिंदीमध्ये केलेल्या या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर म्हणतात, “राहुल गांधी एकलौते ऐसे नेता है, जिनका अस्तित्व और प्रभाव नाकारते नाकारते भाजपा आज उन्ही से डरकर छुपी रहती है. ये डर अच्छा है”. राहुल गांधीच पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी येणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, त्याच वेळी पक्षातील जी-२३ गटानं पक्ष कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सातत्याने राहुल गांधींना लक्ष्य केलं जात आहे.

 

राहुल गांधींची केंद्रावर आगपाखड!

दरम्यान, राहुल गांधींनी आपल्या ट्वीटर हँडलवरून सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणं सुरूच ठेवलं आहे. आज सकाळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्यावरून निशाणा साधला आहे. “देशाला तातडीने आणि पूर्ण लसीकरणाची गरज आहे. मोदी सरकारच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेला लसींचा तुटवडा लपवण्यासाठी भाजपाच्या रोजच्या खोट्या आणि पोकळ घोषणांची देशाला गरज नाही. पंतप्रधानांची खोटी प्रतिमा वाचवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने करत असलेले प्रयत्न करोनाचा प्रसार वाढवत आहेत आणि जनतेचा जीव घेत आहेत”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 6:47 pm

Web Title: congress yashomati thakul targets bjp on rahul gandhi pmw 88
Next Stories
1 उस्मानाबादमध्ये ट्रक पलटी झाल्यानंतर लोकांची झुंबड; ७० लाखांचा माल लुटला
2 “…..म्हणून एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देतो”- खासदार राहुल शेवाळे
3 “मुख्यमंत्र्यांनी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर पदाचा राजीनामा देण्याचं धाडस दाखवणार का?”
Just Now!
X