भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. आमचे कोणी फुटणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता राजस्थानमध्ये भाजपाने आपला घाणेरडा खेळ आणि घाणेरडं राजकारण सुरुच ठेवलं आहे. शेणातला किडा ज्याप्रमाणे शेणातच राहतो तसं यांचं झालं आहे. केंद्रात सत्ता मिळाली असतानाही त्यांना राज्यांमध्ये फोडाफोडी करण्याची हाव आहे. मला सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय असं विचारलं जातं. माझं सर्वांना सांगणं आहे राज्यातलं सरकार स्थिर आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राने देशाला नवं राजकीय समीकरण दिलं असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं.
आणखी वाचा- पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारकडे रोखठोख मागणी
“जर कोणी सरकार अस्थिर करण्याचा किंवा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला चांगलं बडवू. आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी किती दिवस सहन करायची. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
आणखी वाचा- “शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार समजताच शांत बसले”
“माजी मुख्यमंत्री ज्यांना घेऊन फिरत आहेत ते बाहेरुन आलेले लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष किती दुर्बळ झाला आहे हे दिसत आहे. त्यांच्या १०५ पैकी आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधीही परत येतील, याबद्दल तुम्ही हमी देऊ शकत नाही. उलट १०५ पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल,” असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 17, 2020 9:23 am