सांगली जिल्ह्यातील शिराळच्या ‘आयसेरा बायोलॉजिकल’ कंपनीला करोनावर लस बनवण्यास केंद्र सरकारने संमती दर्शवली असून, त्याबाबतचे पत्र केंद्रीय औषध गुणवत्ता नियंत्रण विभागाचे केंद्रीय प्रमाणपत्र अधिकाऱ्यांनी दिले आहे. ‘आयसेरा बायोलॉजिकल’च्या शास्त्रज्ञांनी ‘कोविड- १९’ संसर्गित आजारावर लस शोधण्याचे आव्हान स्वीकारले आहे. ही लस आम्ही बनवूच आणि ती पूर्णपणे भारतीय बनावटीची असेल असा विश्वास कंपनीचे संचालक प्रताप देशमुख व दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

लस निर्मिती आणि चाचण्यांसाठी या कंपनीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. करोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्यास अपवादात्मक परिस्थितीत नियमांच्या अधीन राहून सात ते आठ महिन्यांमध्ये लस तयार करता येईल, असा विश्वास कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.

करोनावर लस शोधण्याचे आव्हानात्मक संशोधन जगभरातील शेकडो कंपन्या व प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञ अविरतपणे करत आहेत. शिराळय़ाच्या आयसेरा बायोलॉजिकल कंपनीत यापूर्वी घटसर्प, सर्पदंश, रेबीजसारख्या आजारांवर प्रतिजैविके बनविली गेली आहेत.

‘आयसेरा बायोलॉजिकल’च्या प्रतिजैविकांमुळे विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यात आजवर यश आले आहे. बालकांमधील घटसर्प या आजारावर हे तंत्र खूपच परिणामकारक सिद्ध झाले आहे. कावीळ, गोवर, रेबीज व अन्नातून होणाऱ्या विषबाधेवरही प्रतिजैविकांचा फायदा झाला आहे. इबोलावरील इलाजातही कंपनीच्या प्रतिजैविकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आयसेराचे संचालक देशमुख व कुलकर्णी यांनी दावा केला आहे की, करोनावर भारतीय तंत्रज्ञानाने बनविलेली प्रतिजैविके अत्यंत कमी वेळेत परिणामकारक ठरतील. वयस्कर व कमी प्रतिकारक्षमता असलेल्या रुग्णांनाही ती जीवदायी ठरतील. प्रचलित औषधांना प्रतिसाद न देणारे रुग्णही या औषधाने सहज बरे होऊ शकतील. आयसेरा कंपनीने केंद्र सरकारकडे लस निर्मिती व चाचणीची परवानगी मागितली होती. कंपनीच्या प्रस्तावाचे विश्लेषण करून परवानगी देण्यात आली आहे. या लसीची क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर उत्पादन करता येईल.  संशोधनाच्या क्षेत्रात ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या दिलीप कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील आयसेराच्या शास्त्रज्ञांची टीम लस निर्मितीसाठी सज्ज झाली आहे. करोनाविरोधातील या लढाईतही यशस्वी ठरू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.