27 September 2020

News Flash

विस्कटलेले संसार नव्याने उभे करण्याचे आव्हान!

महापुरामुळे महामार्गासह राज्य, जिल्हा मार्गासह अगदी गावपातळीवरही हजारो वाहने अडकून पडली आहेत.

विजय पाटील, कराड

कृष्णा, कोयना नदीकाठ जणू उद्ध्वस्त करणाऱ्या महापुराचा ठिय्या पुरता उठला. सांगली, कोल्हापूर, कराड, पाटण या शहरांबरोबरच कोयना-कृष्णाकाठ पुराच्या संकटातून बाहेर पडत आहे. मात्र, आता येथे आरोग्य, सुव्यवस्था, नागरी सेवा-सुविधांच्या समस्यांचा पूर वधारला आहे. या अनंत समस्यांचा निपटारा करण्याचे शासनाच्या विविध खात्यांसमोर आव्हान आहे. तसेच, पूरग्रस्तांचे जनजीवनही गतीने पूर्वपदावर येणे आवश्यक असताना, मात्र मंत्रिगण, राज्यकर्त्यांचे प्रतिनिधी, विरोधीनेते व सरकारी बाबू पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर येऊन त्यांच्या दिमतीला प्रशासन अडकून पडत असल्याने ‘समस्या निवारण’ प्रक्रियेसमोर ‘व्हीआयपी’दौरे हे एक संकट बनून राहिल्याचे दिसते आहे.

कृष्णा, कोयना काठच्या महापुराचा विळखा सुटला आणि पूरग्रस्तांसह प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला असला, तरी पुरानंतरच्या समस्या सध्या आ वासून आहेत. पुरामुळे नागरी वस्त्यामध्ये प्रचंड कचरा वाहून आल्याने तेथे दुर्गंधीचे साम्राज्य माजून आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने नागरी वस्तीतील कचरा हटवून तेथे जंतुरोधक औषध फवारणी करून संपूर्ण परिसर स्वच्छ, र्निजतूक करण्याचे प्रमुख व मोठे आव्हान आज स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. पाठोपाठ दळणवळण यंत्रणा पूर्वपदावर आणणे हेही महत्त्वाचे असून, सध्या अनेक ठिकाणी रस्ते, पूल खचणे, जमिनी भेगाळणे असे प्रकार ठिकठिकाणी घडल्याने यावर संबंधित प्रशासन कसे मात करते यावर नजीकच्या काळात वाहतूक व्यवस्थेची गती राहणार आहे. महापुरामुळे महामार्गासह राज्य, जिल्हा मार्गासह अगदी गावपातळीवरही हजारो वाहने अडकून पडली आहेत. काही वाहनांच्या सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन व अन्य कारणाने वाहने बिघडली आहेत. ही वाहने जागांवरून हलवून निश्चितस्थळी जाऊन पोहोचण्यासाठीही वाहनधारकांना प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे राहणार आहे. सर्वत्र रस्ते खड्डेमय झाल्याने खड्डय़ांचे साम्राज्य हटवून सर्व मार्गावरील रस्ते हे सुसज्ज करण्याचे मोठे आव्हान रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम खात्यावर राहणार आहे. दरम्यान, सर्वच नागरी सुविधांचा बोजवाराही उडाल्याने लोकांना पाणी, आरोग्य, वीज व दळणवळण या आवश्यक सुविधा देणेही संबंधित प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरेल. अशातच शेतपिके पुराच्या पाण्यात बुडून तसेच ठिकठिकाणची शेती पाण्याखाली जाऊन झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्याला तर व्यावसायिक व निवासी मिळकतीत पाणी घुसून झालेल्या आर्थिक अरिष्टतून नागरिक व व्यापाऱ्यांना शासन व प्रशासन कसे बाहेर काढते, त्यांना नुकसानभरपाई कशी मिळते यावर नुकसानग्रस्तांचे भवितव्य अवलंबून आहे.

काही ठिकाणी तर महापुराने लोकांचे संसारच रस्त्यावर आले आहेत. त्यांच्यासाठी शासकीय मदतीबरोबरच समाजाच्या चांगुलपणाचा व सहनुभूतीचा हातभारही महत्त्वाचा ठरणार आहे. पुराचे पाणी घुसलेल्या मिळकतींमध्ये चिखल व कचरा तर, आहेच याचबरोबर सर्प, विंचू व अन्य कीटकही असण्याची शक्यता असल्याने संबंधितांना स्वत:च्या सतर्कतेनेच या संकटावर मात करणे अपरिहार्य बनणार आहे. कच्ची व मातीची घरे आजमितीला ओली असून, त्यात चिखल व घाणीचे साम्राज्य असल्याने येथील ओल व चिखल वाळल्याखेरीज तेथील पूरग्रस्तांना आपल्या घरांमध्ये राहता येणार नाही.

महापूर ओसरल्याने दळणवळण यंत्रणा पुन्हा गती घेऊन असून, दूध, भाजीपाला, इंधन टंचाई हटू लागली असली, तरी पुराच्या आपत्तीकाळात दूधपुरवठा होऊ न शकल्याने बहुतेक उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर, भाजीपाला पाण्यात सडून, कुजून गेल्याने शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होताना भाजीपाल्यांचे दरही भडकले आहेत. कांदा, बटाटय़ाची आवक ठप्प असल्याने त्यांचे दरही १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.

‘व्हीआयपी’ दौऱ्यांची समस्या  

पूरग्रस्तांच्या मदतीच्या निमित्ताने सध्या सुरू असलेल्या व्हीआयपी दौऱ्यांमध्ये महायुती व काँग्रेस आघाडीवर परस्परांकडून टीकाटिपणी व आरोपांच्या फैरी सुरू झाल्याने नेत्यांचे दौरे नुकसानग्रस्तांना दिलासा देणारे, की त्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. राजकारण्यांचे हे दौरे विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ‘नुकसानग्रस्तांना दिलासा’ या मुद्दय़ाचा राजकीय फायदा घेणारे असल्याचे लोकांमध्ये बोलले जाऊ लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 3:40 am

Web Title: consequences of floods on health and civil service facilities zws 70
Next Stories
1 नातीला छातीशी कवटाळत आजी दिसेनाशी
2 गिरीश महाजनांच्या ‘पूरपर्यटना’बद्दल रोष
3 उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने नद्या-नाल्यांना पूर
Just Now!
X