अकाली पावसाने जिल्हय़ातील सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फ टका बसल्याने चिंतेत पडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष पीक विम्याच्या रकमेकडे लागले आहे.

आर्वी, सेलू, वर्धा, देवळी, हिंगणघाट, कारंजा या भागात अकाली पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. गत आठवडय़ात ढगाळी वातावरण व पावसाची रिपरिप यामुळे अती ओलावा शेतमालात नुकसानदायी ठरला. गत रविवारी वादळवाऱ्यासह मोठा पाऊस झाल्याने कारंजा तालुक्यातील बोंदरठाणा, पारडी, पिपरी, नारा, सावळी, ठाणेगाव, कन्नमवारग्राम व अन्य गावात शेतातील कपाशीचे पीक नेस्तनाबूत झाले. शेतकऱ्यांचे शेतात ढीग लावून असलेले सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांना फ टका बसला आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदा, निंबोली, अहीरवाडा, नांदपूर, देऊरवाडा, जळगाव, शिरपूर, राजापूर, खुपगाव, पाचेगाव, दहेगाव, रोहणा, वडगाव, धनोडी, एकलारा या गावातील शेतकऱ्यांचे कापलेले पीक शेतातच होते. त्यालाही परतीच्या पावसाने दणका दिला. सेलू तालुक्यातील काही गावात सोयाबीनचे ढीग शेतातच पडून होते. दिवाळीमुळे गोळा न केल्याने ते ओलेचिंब झाले आहे.

दारोडा परिसरात चांगला पाऊस झाल्याने भरपूर उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. पण पावसाच्या लहरीपणामुळे त्यावर पाणी फे रले. झाडाला बोंडे कमी लागली. ओलावा धरून असल्याने ही बोंडे सडताना दिसत आहे. अनेक परिसरातील झेंडू फुलाला फ टका बसला. अल्लीपूर परिसरातील शेतकरी एका एकरात २५ ते ३० हजार रुपयाचे झेंडू फु लाचे उत्पादन घेत होते. परंतु परतीच्या पावसाने ही फु ले सडली. ग्रामीण भागात दहा रुपये किलोचाही भाव मिळाला नाही. सातत्याने ओलावा व ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीनचा दाणा काळा पडत गेला. काहींनी ओलावा असलेल्या सोयाबीनला घरी आणून पंख्याची हवा देत सुकविणे सुरू केले आहे.

या पाश्र्वभूमीवर नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित सर्वेक्षण होणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक व पुढे दिवाळीच्या सुट्टय़ा आल्याने कृषीखाते अंधारातच होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तहसीलदारांना नुकसान अहवाल बुधवारपर्यत सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ते गुरुवारी सादर झाल्याने नेमके आकडे पुढे आले नाही.

पंचनामे झाल्याशिवाय भरपाई मिळू शकत नाही. शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळण्यासाठी फोरशा अटी ठेवू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना केली.

सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दय़ावी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांना पीकविम्याचा अर्ज ठरलेल्या नमुन्यात सादर केल्यावर नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु याबाबत शेतकरी जागृत नसल्याने त्यांच्यापर्यत प्रशासनाने पोहोचण्याची गरज व्यक्त केल्या जाते. प्रहार संघटनेने गत आठवडय़ातील पाच दिवसात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणत आर्थिक मदतीची मागणी केली. शेतकरी संघटनेने बाजारात होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी केली.

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेताचे पंचनामे झाले आहे. ९० तक्रारी आल्या असून काही बाकी आहे. कापूस पिकाच्या चाळीस हेक्टर क्षेत्रापकी २३ टक्के, सोयाबीनच्या २२ पैकी १९ टक्के, तुरीच्या १० पैकी ८ टक्के क्षेत्राचे पंचनामे झाले आहे. कापणी पश्चात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कार्यवाही प्रगतीपथावर आहे. विमा कंपनीने सोयाबीन १९ हेक्टर, तूर ८ हेक्टर व कापूस २३ हेक्टरवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.

– अनिल इंगळे, जिल्हा कृषी अधीक्षक