बोईसर पोलिसांची अवैध धंद्यांना साथ?

बोईसर : बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदाराने बोईसर पोलीस निरीक्षकांना प्रलोभन दाखवून अवैध धंदे सुरू ठेवायला हप्ता किती घेणार, अशी थेट विचारणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलीस निरीक्षकांनी या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बोईसर परिसरात मटका, जुगार, अमलीपदार्थ विक्री, गुटखा आणि अवैध दारू आणि बेकायदा भंगार व्यवसायांना स्थानिक गुन्हे शाखेचा पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे. कारवाईचा देखावा उभारून महिन्याचा हप्ता वाढवून घेण्याचे प्रकार बोईसरमध्ये अनेकदा उजेडात आले आहेत. वर्षभरात बोईसरमधील भ्रष्ट पोलिसांवर अनेक कारवायाही करण्यात आल्या आहेत, परंतु पैशाची चटक लागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ‘खिशा’त घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे या घटनेतून दिसत आहे.

बोईसर पोलीस ठाण्यात ११ जून रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार रमेश नौकुडकर यांनी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना अवैध धंदे सुरू करण्यासाठी हप्ता किती ठरवायचा, असा थेट सवाल केल्याने पोलीस कार्यालयातील कर्मचारी काहीक्षण अवाक्  झाले.

या साऱ्या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षकांनी संताप व्यक्त करीत त्यांना नकार दिला. यावर नौकुडकर यांनी अधिक हप्त्याचा प्रस्ताव ठेवला. यावर परबकर यांनी नौकुडकर यांच्याविरोधात थेट फिर्याद दाखल केली. यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे नौकुडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी प्रमाण वाढत चालले असून अवैध धंदेही तेजीत आहेत. रसायन माफिया, चोरटी वाळू वाहतूक, कारखान्यात होणारी भंगार चोरी, मटका, जुगार, गांजा विक्री, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री अशा अनेक अवैध धंद्यांना पोलिसांचे संरक्षण असल्याचा आरोप नागरिकांकडून अनेक वेळा होत होता. परंतु आता पोलिसांनीच पोलिसांवर कारवाई केल्यामुळे अवैध धंद्यांना असलेला पोलिसांचा छुपा पाठिंबा समोर आला आहे.