परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या १७ लाख ६५ हजार ७९१ असून यात ९ लाख ३० हजार ८०४ पुरुष, तर ८ लाख ३४ हजार ९८७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. मतदारांचे यादीवरील छायाचित्र काढण्याचे काम जवळपास ९४ टक्के पूर्ण झाले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. सिंह यांनी सांगितले.
परभणी मतदारसंघात १ हजार ९७४ मतदान केंद्रे राहणार आहेत. यात जिंतूर ३५६, परभणी २८७, गंगाखेड ३५३, पाथरी ३४४, परतूर ३१४, घनसावंगी ३२० असा समावेश आहे. एकूण मतदारांपकी १६ लाख ६९ हजार ५०९ मतदारांचे छायाचित्र मतदारयादीवर आहेत. १६ लाख ८० हजार ४७३ मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. निवडणुकीची अधिसूचना १९ मार्चला निघणार असून २६ मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येईल. दि. २७ मार्चला नामनिर्देशनपत्राची छाननी, तर २९ मार्च नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करताना शपथपत्रात उमेदवारांनी पूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. याची पूर्तता न झाल्यास नामनिर्देशनपत्र रद्द होऊ शकते, असे सिंह यांनी स्पष्ट केले. सर्व मतदार केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृह, सावलीसाठी शामियाना आदी पुरविण्यात येणार आहे. उमेदवाराकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी ४ निरीक्षक नियुक्त केले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना मतदान स्लीप दिली जाणार आहे.
आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोर केली जाईल, असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. उमेदवाराच्या परवानगीशिवाय एखाद्या खासगी मोकळ्या जागेवर किंवा इमारतीवर उमेदवाराचे पोस्टर लावल्यास संबंधित जागामालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील. ५० हजारपेक्षा अधिकची रोख रक्कम कोणाकडे सापडल्यास त्याबाबतही सखोल चौकशी केली जाईल. निवडणूक काळात जिल्हाभर बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे, उपनिवडणूक अधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.