औद्योगिक वापरातील प्राणवायू वापरण्याची योजना कार्यान्वित

पालघर : पालघर जिल्ह्यतील डहाणू व जव्हार उपजिल्हा रुग्णालय तसेच पालघर ग्रामीण रुग्णालयासाठी प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडणार आहे. या परिस्थितीत औद्योगिक वापरातील प्राणवायूची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून  रुग्णालयांना  पुरवठा करण्याचे योजना कार्यन्वित करण्यात आली आहे.

जव्हार, डहाणू व पालघर येथील शासकीय करोना रुग्णालयात प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी  आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.   या प्राणवायू प्रकल्पाचे कॉम्प्रेसर व टाक्या उभारणीसाठी आवश्यकते बांधकाम हाती घेण्यात आले असून या प्रकल्पांमधून दररोज सव्वा टन प्राणवायू उत्पादित होईल, अशी अपेक्षा आहे. समर्पित करोना रुग्णालयाच्या ठिकाणी उत्पादित होणारा प्राणवायू त्या रुग्णालयातील दैनंदिन वापरासाठी पुरेसा पडेल व दररोज किमान १२५ जम्बो सििलडरचे रिफलिंग होईल इतके उत्पादन होऊ शकेल असा अंदाज बांधण्यात आला आहे.

याखेरीज जिल्ह्यत ५० मेट्रिक टन प्राणवायू उत्पादन व साठा करण्याची विशेष योजना आखली जात आहे. त्याकरिता जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाचे लगतच्या जागेत हा प्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे. या कामासाठी मंत्रालय स्तरावर मान्यता प्रलंबित असून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर हा प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

दरम्यान तारापूर येथील विराज प्रोफाइस लिमिटेड व हॅरीसन्स स्टील लिमिटेड या पोलाद उद्योगातून शासकीय रुग्णालयांकरिता प्राणवायू सिलेंडरचे रिफिलिंग सुरू  झाले असून वाडा तालुक्यातील आणखी एका पोलाद उद्योगातील प्राणवायू मानवी वापरासाठी प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

४५ ऑक्सिजन यंत्रणेचे वितरण

करोना काळजी केंद्रांमध्ये अचानकपणे गंभीर होणाऱ्या किंवा प्राणवायूची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार पुरवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर, पुणे यांच्याकडून ४५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट प्राप्त झाले आहेत. यापैकी कांबळगाव  आश्रमशाळा, आयडियल रुग्णालय पोशेरी तसेच आदिवासी विकास विभागाचे मुला-मुलींचे वसतिगृह पालघर येथे प्रत्येकी १० तर उधवा आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालय डहाणू तसेच उपजिल्हा रुग्णालय कासा येथे प्रत्येकी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली आहे.