रत्नागिरी : येथील उद्यमनगर परिसरातील महिला रुग्णालयाच्या बांधकामावरील लाद्या अंगावर पडून दोन हमालांचा मृत्यू ओढवला, तर आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये सूरज सुधाकर सोलकर (वय २१ वर्षे, रा. केळये) आणि सावळे निसाद केवठ या मूळच्या कर्नाटकातील  हमालाचा मृत्यू झाला आहे.

शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाचे काम उद्यमनगर येथे गेली तीन वर्षे सुरू आहे. शहरातील एका नामांकित ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. त्यापैकी एका भागीदाराने महिला रुग्णालयाच्या कामावरील असलेले मोठे कडप्पे टेम्पोत भरून दुसऱ्या बांधकामावर पोचवण्यासाठी गाडी पाठवली होती. मंगळवारी रात्री टेम्पोचालक चार हमाल घेऊन कडप्पे  भरण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात आले. तेथे एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत टेम्पो उभा करण्यात आला होता. झुकलेल्या बाजूला कडप्पे भरल्यानंतर उर्वरित कडप्पे दुसऱ्या बाजूला भरण्याचे काम सुरू होते. हे काम करत असताना अचानक एका बाजूचे कडप्पे हमालांच्या अंगावर कोसळले. यामध्ये सूरज सुधाकर सोलकर व कर्नाटकातील आणखी एका हमालाचा टेम्पोतच मृत्यू झाला, तर संतोष कांबळे आणि सुभाषचंद्र नाईक हे दोन हमाल गंभीर जखमी झाले आहेत. चौघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोन हमालांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

गंभीर जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मोठय़ा संख्येने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. कडप्पा भरण्यासाठी टेम्पोचालकाने टेम्पो निसरडय़ा स्थितीत लावला होता. त्यामुळे कडप्पे दुसऱ्या बाजूला कोसळले.

टेम्पो दुर्घटनेत दोन हमालांचा मृत्यू झाल्यानंतरही ठेकेदार ग्रुप कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने रात्री अकरा वाजेपर्यंत घटनास्थळासह जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट दिली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले. या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यासह दोघा मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. पण घटनास्थळी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.