* दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवरील एका समूहावर एक संदेश फिरला. ‘रविवारी मुंबईत एमपीएससीची परीक्षा आहे. घर पाण्याने भरले आहे, गावातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबई गाठायची आहे. काय करू?’.. पुढच्या क्षणाला धीर देणाऱ्या संदेशांचा महापूर सुरू झाला.. काय करता येईल, याची चर्चा सुरू झाली. परीक्षा मंडळास आणि मंत्र्यांना अडचणीची माहिती द्या, अडचण कळविल्याशिवाय मार्ग निघणार नाही, असा सल्ला दिला गेला, आणि मंत्री, परीक्षा मंडळावर ट्वीटरचा पाऊस सुरू झाला.. अखेर परीक्षेचे वेळापत्रक बदलले, आणि संपूर्ण समूहाने सुटकेचा श्वास सोडला..

* हॉटेल ओरिएंट क्राऊनमध्ये आश्रय घेतलेल्या पूरग्रस्तांसाठी ‘रॉबिनहूड आर्मी’ने ५०० लोकांना पुरेल एवढे जेवण नेऊन दिले.  ‘धनंजय महाडिक युवाशक्ती’च्या कार्यकर्त्यांनी राहण्याची सोय केलीच, पण कोरडे कपडे, जेवणाचीही व्यवस्था करून कुटुंबभावाचे दर्शन घडविले..

* कोल्हापूर सातारा महामार्गावर असंख्य ट्रक अडकून पडले होते. मग माणुसकीने तेथे धाव घेतली, आणि ट्रकचालक, क्लीनर आणि अडकलेल्या अनेक वाहनचालकांनी जेवण करून कोल्हापूरकरांच्या माणुसकीला दुवा दिला.. जणू प्रत्येक जीव वाचविण्याचा, सुरक्षित राखण्याचा निर्धार करून कोल्हापुरातील अवघी युवाशक्ती पुराच्या पाण्यात गावाच्या रक्षणासाठी उतरली होती..

* एका ‘बच्चनवेडे ग्रुप’ने संकटग्रस्तांसाठी साबण, टूथपेस्ट, मच्छर अगरबत्ती, लेडीज गाऊन,  टॉवेल आदी सामान गोळा करण्यासाठी टेंबे रोड कॉर्नरवर केंद्रच सुरू केले, आणि याच वस्तूंची गरज असलेल्या संकटग्रस्तांपर्यंत ते पोहोचविण्यासाठी तरुणाई कामाला लागली..  ‘माणुसकीची भिंत’ तर जागोजागी संकटाला छाताडावर झेलण्यासाठी उभी राहिली होती.. अनेक ठिकाणी आश्रय केंद्रे सुरू झाली आहेत. बुधवार पेठ, शनिवार पेठ, उत्तरेश्वर पेठेतील तालीम मंडळांचे कार्यकर्ते तर, अक्षरश संकटग्रस्तांच्या मदतीसाठी राबत होते.

* अशपाक व अमीन या आपल्या दोन मुलांसह संपूर्ण दोन दिवस पाण्यात राहून अनेक संकटग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढणारे मुस्लिम बोर्डिग अध्यक्ष गमीभाई आजरेकर यांनी बोर्डिगमध्ये आश्रय घेतलेल्यांसाठी साबण, मेणबत्त्या, महिलांना आवश्यक असलेली वस्त्रे, गाऊन आदींची जमवाजमव सुरू केली, तर संकटग्रस्तांसाठी सतरंज्या, चादरी, चटया घेऊन दसरा चौकात तरुणाईची रीघ लागली..

* रॉबिनहूड आर्मी, खासबाग मैदान येथील ऊर्जा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सॅनिटरी नॅपकिन्स गोळा करून वाटपाची जबाबदारी घेतली.. देशभक्त सामाजिक फाऊंडेशन, मनस्पंदन फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हणमंतवाडी-शिंगणापूरच्या शाळेत आश्रय घेतलेल्या सुमारे ७०० जणांच्या जेवणाची जबाबदारी घेतली..

* कोल्हापूरच्या राधानगरीत राहणाऱ्या सुहास आणि मानसी निर्मळे यांनी फेसबुकवर लिहीले, ‘पुरामुळे कोल्हापूर शहरातील सर्व पंपिंग स्टेशन्स पाण्याखाली गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आमचे घर उंचावर असल्याने इथं पूरपरिस्थिती नाही. आमच्या घरुन पूरग्रस्त बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल. घरच्या पत्त्यावर येऊन लोकांनी आवश्यक तेवढे पिण्याचे पाणी घेऊन जावे.’..

* सांगलीतील पलूस येथे पवार हॉस्पिटलमध्ये डॉ. साधना पवार आणि डॉ. अमोल पवार यांनी शेकडो लोकांच्या राहण्याची, अन्न औषधांची व्यवस्था केली. ‘पूरग्रस्तांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये आसरा घ्यावा.’ अशा आशयाच्या अनेक नोंदी व इतर माहिती डॉ. साधना सातत्याने फेसबुकच्या माध्यमातून लिहीत आहेत..

या नैसर्गिक आपत्तीदरम्यान अनेक स्वयंसेवी, समाजसेवी संस्थानी तत्परतेने मदतीचा हात पुढे केलेलाच आहे मात्र अशा संस्था, समूहांशी न जोडलेले लोकांनी समाजमाध्यमांचा विधायक उपयोग करत वैयक्तिकरित्या यथाशक्ती मदत करुन पूरग्रस्त बांधवांना दिलासा दिला आहे. सरकारी मदत, प्रशासकीय यंत्रणा कोलमडली, तरी समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणात विधायक वापर करत सजग नागरिकांनी मदतकार्यात खारीचा वाटा उचलला आहे. याची काही वानगीदाखल उदाहरणे..