29 October 2020

News Flash

अत्यावशक सेवा व सलग उत्पादन प्रक्रियेच्या सबबीखाली उत्पादन सुरू ठेवण्याचा घाट

आदेशाचे पालन न करणाऱ्या उद्योगांकडे प्रशासन सोयिस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप

प्रतिकात्मक छायाचित्र

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर एकीकडे सर्वसामान्य माणसाला बाहेर निघण्यास प्रशासन मज्जाव करत असून अनेकदा घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद किंवा शिक्षेला सामोरे जावे लागत असताना, तारापूर येथील काही उद्योगांनी अत्यावश्यक सेवा व सलग उत्पादन प्रक्रियेच्या नावाखाली आपले उत्पादन सुरू ठेवल्याचे दिसून आले आहे.

या उद्योगांमध्ये मोठ्या संख्येने कामगार हजर राहत असल्याचे तसेच सार्वजनिक संपर्क टाळणे व सामाजिक अंतर राखले जात नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. बोईसर- तारापुर भागात सध्या करोनाचा एकही रुग्ण नसला तरीसुद्धा शासकीय नियमांचे उद्योगांकडून उल्लंघन होत असल्याने आपण आजाराच्या ज्वालामुखीवर असल्याची भीती येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

देशामध्ये संचारबंदी व पाठोपाठ टाळेबंदी जाहीर केल्यानंतर उद्योगांना आपली कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेले व सलग उत्पादन प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना वगळण्यात आले होते. एकीकडे तारापूर मध्ये इस्पात उद्योगातील अग्रगण्य असलेल्या टाटा समूह व जेएसडब्ल्यू सारख्या उद्योगांनी आपले उत्पादन बंद ठेवण्याचे पसंत केले असताना, या क्षेत्रातील इतर काही उद्योगांनी सलग उत्पादन प्रक्रिया व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आपले उत्पादन सुरू ठेवल्याचे दिसून आले आहे. या उद्योग समूहाच्या कंपन्यांमध्ये शेकडो कामगार एकाच वेळी व एकत्र काम करत असल्याचे तसेच एकमेकांशी व सार्वजनिक संपर्क टाळण्यासाठी त्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंब करीत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. असे असताना त्याविषयी जिल्हा प्रशासन सोयीस्कररीत्या दुर्लक्ष  करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

अत्यावश्यक सेवा व सलग उत्पादन प्रक्रिया असलेल्या उद्योगांना परवानगी देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन सुरू ठेवण्यास अनुमती देण्यासाठी आवश्यक त्या दोन्ही बाबी ठरवण्याची जबाबदारी उद्योग विभागाला देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब एमआयडीसी व डीआयसी या विभागांकडून ठरवली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रत्यक्षात सलग उत्पादन प्रक्रिया असणाऱ्या उद्योगाना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून परवानगी घेताना तसे खास नमूद करणे आवश्यक असते. तारापूर मधील एकाही उद्योगाने अशा प्रकारची परवानगी घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचप्रमाणे तारापूर येथील काही उद्योग रात्रीच्या वेळी आपले उत्पादन परवानगी नसताना सुरू ठेवत असल्याची माहिती देखील पुढे येत असून जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात कानाडोळा केला जात असल्याचे आरोप होत आहेत.

तारापूर मध्ये सध्या करोना संसर्गाचा एकही रुग्ण नसला तरी तरीदेखील अनेक कामंगार दाटीवाटीच्या वस्तीमध्ये एकत्रितपणे राहत आहेत. अशा परिस्थितीत उत्पादन बंद करण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास व कामावर असलेल्या नागरिकांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला तर तारापूर मध्ये हाहाकार माजेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागत असताना, काही उद्योगांवर मात्र प्रशासन मेहरबान झाल्याचे तारापूरमध्ये दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 4:57 pm

Web Title: continues production in lockdown msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 नांदेडमध्ये दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी
2 काम करताना किंचाळण्याची गरज नसते; उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना रोहित पवारांचा विरोधकांना चिमटा
3 करोनाच्या संकटातही कुपोषण नियंत्रणासाठी जिल्हापरिषद प्रयत्नशील
Just Now!
X