चार दिवसांच्या उसंतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली आहे. श्रावण मासारंभ सुरू झाल्यापासून बुधवारी प्रथमच पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी झाली होती. आता पुन्हा एकदा पाणी पातळी किंचितशी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०६ मि.मी. पावसाची नोंद झाली. अद्यापही २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरीतून १८००, वारणेतून १७७५, कासारीतून २५०, कडवीतून ५१३ आणि घटप्रभेतून ९२४,जांबरेतून ७९८ तर कोदे लघु पाटबंधाऱ्यातून ४०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जून व जुलचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. जुलच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस झाला. विशेषत पश्चिमेकडील धरण भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे पश्चिमेकडील भागात असणाऱ्या धरणामध्ये जलसंचय वाढत गेला. सध्या अनेक धरणांमध्ये सरासरी ७५ टक्के जलसंचय झालेला आहे. श्रावण सुरू होण्याच्या अगोदर दोन दिवस पावसाने दडी मारली होती. गेले चार दिवस पावसाचे दर्शन घडले नव्हते. मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. बुधवारी दिवसभर पाऊस सुरू होता. पश्चिमेकडील भागात पावसाची संततधार सुरू होती तर पूर्वेकडील भागात पाऊस पडल्याचे वृत्त आहे. पावसाचे पुनरागमन झाल्याने बळिराजाच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून आजअखेर सरासरी ८११.५० मि.मी. पावसाची नोंद झाली तर जिल्ह्यात एकूण पाऊस ९७३७.९८ मि.मी. झाला आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. तालुक्याच्या नावापुढे चोवीस तासांत झालेला पाऊस दर्शविण्यात आला असून कंसात १ जून २०१४ पासून झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी दिली आहे.
करवीर १६.६९ (३५८.६९), कागल २२.३१ (४४१.९५), पन्हाळा २४ (७१९.५३), शाहूवाडी ३१ (१२२२.३६), हातकणंगले २ (२४०.३८), शिरोळ ३.५७ (१८०.६९), राधानगरी ४५.६७ (९४१.४६),गगनबावडा १०६ (२६४५), भुदरगड ३४.८० (८४४.६०), गडिहग्लज १० (३०६.९७), आजरा ४९.५० (८३४.२५), चंदगड ४८.५० (१००२.१०) नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरी आजपर्यंतच्या पावसाने जिल्ह्यातील २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. घटप्रभा धरण तसेच कोदे लघु पाटबंधारे आणि कडवी धरणे पूर्ण भरलेली आहेत. राधानगरी धरण ८८ टक्के, तुळशी ७१, वारणा ८६, दूधगंगा ६२, कासारी ९३, कुंभी ७४, पाटगाव ६८, चिकोत्रा ३३, चित्री ७५, जंगमहट्टी ८० टक्के तर जांबरे ३७ टक्के भरले आहे.