पिकातले पाणी हटेना, यंत्रणा बांधापर्यंत पोहोचेना

परभणी : जिल्ह्यत शुक्रवारीही पावसाची संततधार सुरूच होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सतत बरसत असल्याने पिकातले पाणी हटेना आणि पंचनामे करण्यासाठी महसूल यंत्रणेला बांधापर्यंत पोहोचता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शुक्रवारी पीकविमा नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेतकऱ्यांना भरपावसात कसरत करावी लागली.

जिल्ह्यात जुलै महिन्यात सतत पाऊस पडत आहे. गुरुवारी तब्बल ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद होती. जिल्ह्यत दहा दिवसात चार वेळा वेगवेगळ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यतील सर्वच ओढे-नाले तुडुंब भरून वाहिले तर शेकडो हेक्टरखालील पिके अद्यापही पाण्याखाली आहेत. आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर वातावरण ढगाळ आणि पावसाची रिपरिप यामुळे शेतातील पिके अजूनही पाण्याखालीच आहेत. नुकसान भरपाईच्या पंचनाम्यासाठी ७२ तासांच्या आत नोंदणी करण्याचा निकष असल्याने आणि अद्यापही शेताशिवारात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी असल्याने थेट बांधापर्यंत जाण्यास अडचणी येत आहेत. अद्यापही काही भागात ओढे—नाले वाहत असल्याने शेतापर्यंत पोहचणे कठीण झाले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने सखल भागातील पिके पाण्याने पिवळी पडायला प्रारंभ झाला तर काही ठिकाणी कापूस, किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.

दरम्यान पिकांच्या नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याची अट शिथिल करण्यात यावी, अनेक ठिकाणी अद्यापही नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती असल्याने व हजारो एकर पिके पाण्याखाली असल्याने शेतकरी आपल्या नुकसानीची नोंदणी करू शकत नाही. अशावेळी ७२ तासांची अट शिथील करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्ह्यत अतिवृष्टीमुळे कच्च्या व मातींच्या घराची पडझड होण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या आहेत. पूरग्रस्त भागातील शेतजमीन खासून गेले असून अनेक ठिकाणी कृषी साहित्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यतील रस्ते, पूल यांच्या नुकसानीचे आकडेही प्रशासनाच्या वतीने गोळा केले जात आहेत. अद्यापही शेतात पाणी असल्याने हजारो हेक्टरखालील कापूस, सोयाबीन, मुग, उडीद या पिकांपुढे  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी विविध पक्षसंघटनांच्या वतीने प्रशासनाकडे केली जात आहे. तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिवृष्टी संदर्भातील निवेदनांचा ओघ सुरूच आहे.