28 September 2020

News Flash

वेगवान वाऱ्यांसह कोकणात संततधार

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत एकूण सरासरी ९२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद

संग्रहित छायाचित्र

वेगवान वाऱ्यांसह पडणाऱ्या मुसळधार पावसाने मंगळवारी दिवसभर कोकणाला झोडपून काढले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून झाडे पडण्याचे किंवा दरड कोळण्याचेही प्रकार काही ठिकाणी घडले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत एकूण सरासरी ९२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस (१४२ मिलीमीटर) पडला, तर राजापुरात झाड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू ओढवला.

मंडणगड तालुक्यातील भारजा नदीसह जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, गडनदी, शास्त्री, बावनदी, काजळी, अर्जुना या सर्व मोठय़ा नद्यांना आलेल्या पुरामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी दोन्ही तीरावरील भातशेती पाण्याखाली  गेली आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून घर-गोठय़ांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

सोमवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत होता.

या पावसाने जराही उसंत न घेतल्याने मंगळवारीदेखील पावसाचा जोर कायम होता. दुपारनंतर जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने सकाळीच धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे खेडमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीने इशारा पातळी पार केली आहे.

चिपळूण शहर आणि आसपासच्या परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरात पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, ज्यामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन चिपळूण मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी केले आहे. तालुक्यातील मौजे मुंढे तर्फे चिपळूण येथे रामदास नारायण मोडक यांच्या घरावर झाड पडल्यामुळे अंशत: नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतील सुमारे दीडशे दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. बाजारपेठेत सुमारे तीन फूट पाणी असून पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे रत्नागिरी-देवधे मार्ग पूर्णत: बंद झाला आहे.

राजापूर तालुक्यात प्रिंदावण येथील शिल्पा शंकर धुरी (वय ४५ वर्षे) यांच्या अंगावर वृक्ष कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुंभवडे येथे राजाराम शांताराम बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडले, तर जुवाटी येथे नंदकिशोर राजाराम मयेकर यांच्या घरावरदेखील झाड कोसळून घराचे अंशत: नुकसान झाले आहे. दोनिवडे येथील शेतकरी संतोष कुळ्ये यांचा बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

जिल्ह्यातील इतरही नद्या-नाले ओसंडून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिला आहे.

मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९२.७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक, १४२.३ मिलीमीटर पाऊस पडला असून त्याखालोखाल गुहागर (११०.६ मिमी), मंडणगड (१०२.३), खेड (९८.६), चिपळूण (८३.६), दापोली (७०.८), लांजा (६५.८) आणि राजापूर तालुक्यातही (६०.३) पावसाचा जोर राहिला. त्या तुलनेत रत्नगिरी तालुक्यात (३३.३)  तो कमी राहिला.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे मंगळवारी जनजीवन विस्कळीत झाले. सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दाणादण उडाली. तेथील छपराचा पत्रा अंगावर पडल्याने महिला विक्रेती जखमी झाली, तर  मोती तलावाच्या काठी असलेले भलेमोठे झाड उभ्या असलेल्या कारवर कोसळल्यामुळे अपघात झाला.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण सरासरी ११२.४२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक १४० मिलीमीटर पाऊस पडला असून दोडामार्ग (१३३ मिमी), वेंगुर्ला (१२८.४), वैभववाडी (१२८), कुडाळ (११४),  कणकवली (९२), देवगड (८४) आणि मालवण (८० मिमी) तालुक्यातही पावसाचा जोर कायम होता.

दरम्यान, येत्या गुरुवापर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:19 am

Web Title: continuous winds in konkan with strong winds abn 97
Next Stories
1 ८३ वर्षीय आजी करोनामुक्त 
2 करोना काळात उद्योगक्षेत्रांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री
3 रायगड जिल्ह्यात ३८८ करोनाचे नवे रुग्ण
Just Now!
X