उमतोलपाडा मुख्य रस्त्याच्या कामाची रखडपट्टी; नोटिशींना ठेकेदाराकडून केराची टोपली

डहाणू : रामपूर ग्रामपंचायतीअंतर्गत उमतोलपाडा मुख्य रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडले आहे. त्यामुळे उमतोलपाडा, पारधीपाडा, नारळीपाडा आणि दुबळपाडा ग्रामस्थांना रोज  जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित  ठेकेदारास वारंवार नोटिशी बजावल्या असून त्यांना ठेकेदाराने दाद दिली नसल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रामपूर येथून उमतोलपाडा रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. फेब्रुवारीमध्ये योजनेतून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम करण्यात आल्याने तो प्रवासासाठी धोक्याचा ठरत आहे. करोनाकाळात रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले.  त्यामुळे अर्धवट अवस्थेतील या रस्त्यावरील प्रवास जिकिरीचा ठरत आहे. पावसाळ्यात दुबळपाडा येथील एक वृद्ध महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.

रामपूर उमतोलपाडा रस्त्यावरील खडी उखडली आहे. पावसाच्या पुरात मातीचा भराव वाहून गेल्याचे उमतोलपाडय़ातील रहिवासी जितू धोडी यांनी सांगितले.

रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या भागात बागातदार तसेच रोपवाटिका असून वाहनासाठी काही भागात स्वखर्चाने भराव टाकला आहे. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठेकेदारास अनेकदा लेखी सूचना दिल्या आहेत. मात्र, ठेकेदार या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण मोहिते यांनी सांगितले.