News Flash

उस्मानाबाद : भूमीपुत्रांच्या ‘मिशन वायू’मधून ७० बेडच्या मिनी ‘आयसीयू’ची निर्मिती

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी हातभार

ऑक्सिजन अभावी उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा भूमीपुत्र असलेल्या तरुणाने आपल्या जिल्ह्याला करोना संकटावर मात करण्यासाठी लाख मोलाचा हातभार लावला आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या ‘मिशन वायू’अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात ७० बेडचे सेमी आयसीयू यातून निर्माण झाले आहे. डॉ. रत्नदीप जाधव यांनी जिल्ह्याला पाच बायपॅप मशीन आणि ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर निशुल्क प्राप्त करवून दिले आहेत. त्यामुळे ऐन तुटवड्याच्या काळात नवसंजीवनी देणारा प्राणवायू जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाला आहे.

सिंगापूर येथून मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सने चार हजार ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले आहेत. ७० हजार ते एक लाख रुपये किंमतीचे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर राज्यातील विविध जिल्ह्यात गरजेनुसार दिले जात आहेत. या यादीत उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव नसल्याचे मूळचे उस्मानाबाद येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. रत्नदीप जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी याकडे मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वैद्यकीय सोयीसुविधांची कमतरता असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात प्रधान्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याची जाधव यांनी विनंतीही केली. त्यासाठी सहा लाख रुपयांचे डोनेशनही जाधव यांनी उत्स्फूर्तपणे जमा केले. त्यापोटी २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तत्काळ उस्मानाबादसाठी उपलब्ध झाले आहेत. तर जाधव यांच्या विनंतीवरून उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मराठा चेंबर्स ऑफ कोमर्सने ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर निशुल्क उपलब्ध करून दिले आहेत.

पहिल्या लाटेच्या तुलनेत जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्येचा आलेख तिपटीने वाढला आहे. प्रशासकीय पातळीवर आरोग्य सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे साहजिकच आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. ऑक्सिजन बाबतही तीच अवस्था आहे. ही बाब लक्षात डॉ रत्नदीप जाधव व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत गिरबने यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या मिशन वायू अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. लोकांकडून वर्गणी गोळा करून स्वयंप्रेरणेने त्यांनी ही कामगिरी केली. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह अडीच लाख रुपये प्रति मशीन किंमत असलेल्या पाच बायपँप मशीनही त्यांच्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्या आहेत.

आणखी २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळतील : जाधव
उस्मानाबाद जिल्ह्यातील संकट पाहता आणखी २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध होत आहेत. त्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे खरे तर मनापासून धन्यवाद. जिल्ह्यातील तरुण आणि क्षमता असलेल्या नागरिकांनी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उस्मानाबाद पेजवर उत्स्फूर्तपणे आपले आर्थिक योगदान द्यावे जेणेकरून आपल्या जिल्ह्यात महत्वाची साधनसामग्री उपलब्ध करवून घेण्यासाठी मदत होईल, असे आवाहनही डॉ. रत्नदीप जाधव यांनी केले आहे.

दहा टक्के रुग्णांची सोय झाली : दिवेगावकर
जिल्ह्यात ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. शासकीय आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून आजवर २५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध झाले आहेत. संकट खूप मोठे आहे. पण डॉ. रत्नदीप जाधव यांच्यासारख्या तरुणांच्या पुढाकाराने खूप दिलासा वाटतो. त्यामुळे या परिस्थितीमधून नक्की आपण वाट काढू असा विश्वास येत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 4:13 pm

Web Title: contribution for oxygen supply from maratha chambers of commerce msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाउन करा”; मुंबई हायकोर्टाची उद्धव ठाकरेंना सूचना
2 साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक; मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद
3 Corona Third Wave : आरोग्यमंत्री टोपेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना, म्हणाले…
Just Now!
X