‘आत्ताच शपथ घेतली, अजून खिसे गरम व्हायचे आहेत. जे लोक आता विरोधात आहेत, त्या जुन्या सत्ताधाऱ्यांकडे खूप पैसे आहेत. त्यांच्याकडून लक्ष्मीदर्शन होत असल्यास नाही म्हणू नका’, असे वादग्रस्त विधान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

वाशीम जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ कामरगाव येथे शनिवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे नव्याने नियुक्त झालेले मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार केला. शनिवारी सायंकाळी काँग्रेसच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंजालाच मतदान करण्याचे आवाहन करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘जी लोक सध्या विरोधात आहेत, त्यांची खिसे खूप भरले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते आपल्या घरी येत असतील. तर त्यांना नाही म्हणू नका. घरी आलेल्या लक्ष्मीला नकार देऊ नका.’

मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळाले. याप्रकरणी मुंबई येथील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घरी आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका, असे वक्तव्य केले होते. आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनीही त्यांचीच री ओढल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.