वर्षभरापासून केरोसिनची टंचाई, पैसे नसल्याने योजनेतील गॅस सिलिंडर शोभेचे

नितीन बोंबाडे, लोकसत्ता 

डहाणू : डहाणू तालुक्यातील गाव खेडोपाडय़ात गेल्या वर्षभरापासून केरोसिनची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. स्वयंपाक, दिवाबत्तीसाठी लागणारे केरोसिन मिळत नसल्याने गोरगरिबांना स्वयंपाकासाठी  पेट्रोल पंपावरून लिटर दोन लिटर डिझेल घेण्याची वेळ आली आहे. पैसे नसल्याने योजनेतून मिळालेले गॅस सिलिंडर हे शोभेची वस्तू झाली आहे.

डहाणूत ८५ हजार शिधापत्रिकाधारक आहे. तर ३२६ किरकोळ  केरोसिन विक्रेते आहेत. सन २०१९ ला डहाणू तालुक्याला जिल्हा पुरवठा विभागाकडून १३ टँकर केरोसिनचा पुरवठा केला जात होता. परंतु वर्षभरात पुरवठा वाढण्याऐवजी त्यात प्रचंड कपात करण्यात आली आहे. तब्बल एक लाख लिटर केरोसिनची कपात झाली आहे.  त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील ग्रामस्थांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सध्या तालुक्याला केवल ४८ हजार लिटर्स  केरोसिनचा पुरवठा केला जात आहे. तो अपुरा असल्याने काहींना वणवण भटकून लाकडे गोळा करावी लागत असून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

पश्चिम किनारपट्टीवरील बहुसंख्य गावात आजही ही स्वयंपाकासाठी स्टोव्हचा वापर केला जातो. परंतु गॅस जोडणी धारकांना अनुदानित केरोसिन न देण्याचे शासनाचे आदेश असल्याने अशांना पेट्रोल पंपावरून इंधन आणावे लागत आहे.

डहाणूच्या दुर्गम भागात पहाटे आंघोळीचे पाणी तापविणे, चूल पेटविणे तर संध्याकाळी दिवा बत्तीसाठी केरोसिनची  गरज लागते. परंतु  काहींकडे असलेल्या शिधापत्रिकेवर उज्वला गॅस जोडणीचा शिक्का असल्याने त्यांना केरोसिन मिळत नाही. तर डहाणू च्या अतिदुर्गम भागातील दिवशी, दाभाडी, गांगुर्डे दाभोण, खुबाळे, गड चिंचले, आंबोली, जामशेत, गांजाड, धानीवरी, ऐना, दाभोण, रायतळी,  इत्यादी ठिकाणच्या आदिवासींकडे तर  आजही शिधापत्रिका नाही. त्यामुळे  शिधावाटप दुकानातील धान्य,  केरोनिसपासून ते वंचित आहेत.

दरम्यान डहाणूच्या पुरवठा विभागाने   गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांंकडून हमीपत्र भरून घेतले आहे. त्यानुसार डहाणू  तालुक्याला एक लाख ६६ हजार लिटर्स केरोसिनची आवश्यकता आहे. परंतु जिल्हा पुरवठा विभाग प्रशासनाकडून डहाणूला केवळ ४४ हजार लिटर्स केरोसिन मंजूर होत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे.

किरकोळ  केरोसिन विक्री करणाऱ्या परवानाधारक दुकानदारांना गॅस कनेक्शन नसलेल्या शिधापत्रिका लाभार्थ्यांंकडून हमीपत्र घेऊन त्यांना केरोसिन देण्याची सूचना केलेली आहे.
– राहुल सारंग, तहसीलदार डहाणू