स्थळांची, प्रत्येक गावातील गल्लीची, एखाद्या भागाची ओळख कशी बनत असेल?- औरंगाबादमध्ये सध्या एका भागाला नवीन नाव द्यावे, अशी स्थिती झाली आहे. घरोघरी गारवा देणाऱ्या कूलरची निर्मिती करणाऱ्यांची रांगच रांग असणाऱ्या या भागाला कूलर गल्ली म्हणावी, अशी स्थिती आहे. अभिनय टॉकीजच्या रस्त्यावर दरवर्षी हा भाग कूलरमय होऊन जातो. घरगुती पद्धतीने बनविलेला हा कूलर अधिक गारवा देणारा असल्याने त्याची उलाढालही लाखो रुपयांमध्ये आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे या भागातील रेलचेलही वाढली आहे. दररोज किमान १०० कूलरची खरेदी नक्की होते. या व्यवसायात काम करणाऱ्या मजुरालादेखील प्रतिदिन ६०० रुपयांपर्यंत मजुरी मिळते. या व्यवसायाची व्याप्ती नागपूर व नेपाळ एवढी आहे.
 सध्या शहराचे तापमान ३६ अंश एवढे आहे. ऊन मी म्हणत असल्याने अंगाची लाहीलाही होते. वेगवेगळ्या कंपन्यांचे कूलर बाजारात उपलब्ध असले तरी त्याची किंमत मध्यमवर्गीयांना परवडत नाही. त्यामुळे देशी बनावटीच्या कूलरला चांगलीच मागणी असते. दिवसेंदिवस हा व्यवसाय अधिक बहरतो आहे. त्यामुळे नागपूरहून लोखंडी पत्रे मागविले जातात. वाळ्यासारखे गवत नेपाळहून मागविले जात असल्याचे आरिफ महंमद यांनी सांगितले. कूलर तयार करण्यासाठी पत्रा वाकविणे, कापणे असे अनेक उद्योगही याच भागात आहेत. कूलरसाठी लागणारे इलेक्ट्रीकचे साहित्य वाळूज औद्योगिक वसाहतीतून आणले जाते. किमान १५०० ते जास्तीत जास्त ५ हजार रुपयांपर्यंत चांगल्या दर्जाचा कूलर मिळून जातो. या व्यवसायामुळे नव्याने या भागाला कूलर गल्ली म्हणावी, अशी स्थिती आहे.