लोकमंगल मल्टिस्टेटची ९१ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा भरारी पथकाने उमरग्यात पकडल्यानंतर वादात सापडलेले भाजपचे नेते आणि मंत्री सुभाष देशमुख यांना सहकार निबंधकांकडून क्लीनचिट मिळाली आहे. तसा अहवाल त्यांनी उमरगा तहसीलदारांकडे पाठवला आहे. ही रक्कम ‘लोकमंगल’ मल्टिस्टेटची असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उमरगा येथे निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सुभाष देशमुख यांच्या संस्थेच्या वाहनातून ९१.५० लाखांची रोकड पकडली होती. पण निवडणुकीच्या तोंडावर ही रक्कम आली कुठून असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. या प्रकरणावरून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या देशमुख यांनी राजीनामा द्यावा, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होत होती. पण या नोटांचा खुलासा नुकताच ‘लोकमंगल’ उद्योग समूहाने केला. ही रक्कम मल्टिस्टेट बँकेची असल्याचे त्यांनी कबूल केले. पूर्वी ही रक्कम ऊसतोड कामगारांना द्यायची असल्याचे सांगण्यात येत होते. मल्टिस्टेट बँकांमधील व्यवहार तपासणीचे अधिकार केंद्रातील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना असल्याने त्यांच्या अहवालानंतरच निवडणूक विभाग करणार असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर सहकार निबंधकांकडून काल, शुक्रवारी रात्री उमरगा तहसीलदारांकडे अहवाल पाठवण्यात आला. त्यात सुभाष देशमुख यांना क्लिन चीट देण्यात आल्याचे दिसते.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली लाखोंची रक्कम लोकमंगल मल्टिस्टेटची असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. लोकमंगल समूहाच्या इतर शाखांतील रक्कम मुख्य बँकेत नेली जात होती. या अहवालानंतर वादात सापडलेल्या सुभाष देशमुख यांना क्लीनचिट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.