एकीकडे सरकारने कापसावर आधारित उद्योगांना चालना देण्याचे धोरण आखलेले असताना विदर्भातील अवसायनात काढण्यात आलेल्या पाच सहकारी सूतगिरण्यांमधील कामगारांची सुमारे १५ कोटी ५३ लाख रुपयांची देणी अजूनही बाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.

दोन वर्षांपूर्वी सत्तेवर येताच भाजप सरकारने राज्यातील २७ सहकारी सूतगिरण्या अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला होता. विशेष वीज देयकाचा भरणा न केल्याच्या कारणामुळे यातील बहुतांश सूतगिरण्या अवसानात निघाल्याचे सांगण्यात आले होते. याचा फटका यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांना बसला. विदर्भातील ५ सूतगिरण्या आर्थिक स्थितीमुळे डबघाईस आल्याने अवसायनात घेण्यात आल्या. त्यामधील कामगारांची देणी सुमारे १५ कोटी ५३ लाख आहे. एकीकडे, शेती प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याचे धोरण राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.  नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्गत २०११ पासून वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या व टफ योजनेंतर्गत पात्र राज्यातील सर्व सूतगिरण्या, जिनिंग प्रेसिंग तसेच वस्त्रोद्योग घटकांना व्याज सवलत मंजूर करण्यात येते. विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग घटकांना १० टक्के भांडवली अनुदान मंजूर करण्यात येते. जुन्या सूतगिरण्यांमधील यंत्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्याची योजना असून या योजनेंतर्गत राज्यातील ११ सहकारी सूतगिरण्यांना ५३ कोटी रुपये भागभांडवल व १५७ कोटी रुपये मुदती कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ज्या सहकारी सूतगिरण्या बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन आधुनिकीकरण किंवा क्षमता वाढवीत असतील, अशा पात्र प्रकल्पांना देखील यंत्रसामुग्रीसाठी घेतलेल्या कर्जावरील ७ टक्के व्याज अनुदान मंजूर करण्याची व संबंधित सूतगिरणी कापूस उत्पादक क्षेत्रात असल्यास १० टक्के भांडवली अनुदान मंजूर करण्याची तरतूद वस्त्रोद्योग धोरणात आहे.

विदर्भातील अवसायनात काढलेल्या सूतगिरण्यांना मात्र वस्त्रोद्योग धोरणाचा लाभ होऊ शकला नाही. राज्यात दरवर्षी ७८ लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. त्यातील ३५ लाख गाठींचे उत्पादन एकटय़ा विदर्भातून होते. विदर्भात सद्यस्थितीत ३१ सहकारी आणि ४५ खासगी सूतगिरण्या कार्यरत आहेत. याशिवाय ५६२ जिनिंग प्रेसिंग देखील अस्तित्वात आहेत.

विदर्भातील ज्या पाच सहकारी सूतगिरण्या अवसायनात काढण्यात आल्या, त्यात अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील सूतगिरण्यांचा समावेश होता. अकोट तालुका सहकारी सूतगिरणी २५ जून १९९८ रोजी बंद झाली. वीज बिल थकीत असल्याचे कारण त्यामागे नोंदवले गेले आहे. पुसद येथील यवतमाळ सहकारी सूतगिरणी अवसायनात निघण्यामागे निधी संपुष्टात आल्याचे कारण दिले गेले. अमरावती कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी बंद पडण्यामागे देखील वीजबिल भरण्याची असमर्थता हे कारण होते. दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी, पांढरकवडा येथील वसंत सूत व कापड सहकारी सूतगिरणी देखील अवसायनात निघाली.