रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरूणांना लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी एका पोलीस हवालदारासह दोघांविरूध्द करमाळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीच्या आमिषाने फसले गेलेल्या चार तरूणांची नावे पुढे आली आहेत.
कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला हवालदार दिगंबर निवृत्ती मारकड (४०, रा. उमरड, ता. करमाळा) याच्यासह त्याचा साथीदार बाळासाहेब मारकड (रा. नातेपुते, ता. माळशिरस) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. पाच वर्षांपूर्वी हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. यासंदर्भात नागेश दत्तात्रेय बरडे (२८, रा. रावगाव, ता. करमाळा) या पदवीधर बेरोजगार तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार नागेश बरडे हा २०१०-११ साली पोलीस खात्यात शिपाईपदासाठी भरती होण्याकरिता पुण्यात हडपसर येथील स्मार्ट अॅकेडमी येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असताना त्याठिकाणी त्याच्याशी पोलीस हवालदार दिगंबर मारकड याची ओळख झाली. या ओळखीतून मारकड याने आपला मित्र बाळासाहेब मारकड हा चार्टर्ड अकौंटंट असून ते रेल्वे खात्यात मुलांना नोक ऱ्या लावतात, बऱ्याच मुलांना त्यांनी रेल्वे खात्यात नोक ऱ्या लावल्या आहेत. त्यासाठी आठ लाखांची रक्कम लागेल, असे सांगितले. परंतु नागेश बरडे याने त्यास प्रतिसाद दिला नाही. तेव्हा नंतर हवालदार मारकड याने साडेचार लाख रुपयांत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यास आश्वस्त केले. एक लाख रुपये वैद्यकीय तपासणीसाठी ठरल्याच्या भूलथापा हवालदार मारकड याने मारल्या. त्यास बळी पडून बरडे याने पुणे येथे रेल्वे स्थानकात हवालदार मारकड यास भेटून एक लाखाची रक्कम दिली. त्यानंतर बरडे याच्यासह नोकरीच्या आमिषाने रक्कम दिलेले बापू थिटे (रा. धायखिंडी), सद्दाम पठाण, समीर पठाण व आरीफ शेख (तिघे रा. जेऊर, ता. करमाळा) अशा चौघा जणांना हवालदार मारकड याने रेल्वेने पाटणा येथे नेले व तेथे सर्वाची वैद्यकीय तपासणी झाल्याचा बनाव केला . त्यानंतर सर्वाना गावी पाठवून नोकरीचे नेमणूकपत्र देतो म्हणून प्रत्येकी एक लाखाची रक्कम वसूल केली. त्या वेळी हवालदार मारकड याच्यासोबत बाळवासाहेब मारकड हादेखील होता.
दरम्यान, नोकरीच्या कामासाठी नागपूरला जायचे असल्याचे कारण पुढे करीत हवालदार मारकड याने करमाळा येथे मौलालीच्या माळावर प्रत्येकी अडीच लाखांची रक्कम उकळली. नागपूरला सर्वाना घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी नोकरीचे प्रशिक्षण देण्याचे कारण सांगून चारही बेरोजगार तरूणांना १५ दिवस तेथेच एका हॉटेलात ठेवले. त्यानंतर सर्वाना पुन्हा गावाकडे पाठवून नोकरीचे नेमणूकपत्र आणून देतो, अशी थाप मारली. परंतु त्यानंतर कधीही हवालदार दिगंबर मारकड व बाळासाहेब मारकड या दोघांनी नोकरी लावली नाही आणि घेतलेली रक्कम परतही केली नाही. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अखेर नागेश बरडे याने पोलिसात धाव घेतली.