नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवरील कर्मचारी जिल्हा मुख्यालयी परतत असताना सशस्त्र नक्षलवाद्यांनी चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली येथे सुरूंग स्फोट घडवून आणल्यानंतर केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा सज्जन भारती (४०) हा जवान गंभीर जखमी झाला. त्याला हेलिकॅप्टरने नागपूरला नेऊन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली मतदान केंद्रावरही नक्षलवादी व पोलिस दलात चकमक उडाली. या घटनेनंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले.
नक्षलवाद्यांच्या धमकीला न घाबरता अतिदुर्गम भागातील आदिवासींनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावल्याने डगमगलेल्या नक्षलवाद्यांनी मोठी हिंसक कारवाई किंवा सुरूंग स्फोट करण्याच्या दृष्टीने कालपासूनच प्रयत्न सुरू केले होते. परंतु, जिल्हा पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कडक सुरक्षेमुळे त्यांना जंगलाबाहेर पडता आले नाही. पोलिसांनी चारही बाजूंनी त्यांना जंगलात घेरलेले असतांनाही चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली येथील मतदान कर्मचारी पथक सायंकाळी ४.३० वाजता मतदान प्रक्रिया आटोपून जिल्हा मुख्यालयी परतताना नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट केला. यानंतर हे कर्मचारी व पोलिस पथक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळू लागले. मात्र, केंद्रीय राखीव पोलिस दल व सी-६० पथकाने त्यांना संरक्षण देऊन नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे अर्धा तास ही चकमक सुरू होती. गोळी लागल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाचा सज्जन भारती हा जवान गंभीर जखमी झाला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना जंगलात हाकलून लावल्यानंतर हेलिकॅप्टरने भारती याला गडचिरोलीला आणून प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी हेलिकॅप्टरनेच नागपूरला खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातही ताडपल्ली मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर नक्षलवादी आले होते. ही माहिती मिळताच पोलिसांना तेथे सी-६० बटालियनचा मोठा ताफा पाठविला. सशस्त्र नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू करताच पोलिसांनीही चोख उत्तर दिले. कडक पोलिस बंदोबस्त असल्याचे बघून नक्षलवादी जंगलात पसार झाले. या दोन घटना वगळता जिल्हाभरात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.