पनवेल पालिकेचा निर्णय; ५० हजार मुखपट्ट्या खरेदी करणार

पनवेल : पनवेलमध्ये मृत्यूही महाग झाल्याचे वास्तव लोकसत्ताने ‘पनवेलचे दुखणे’ या वृत्त मालिकेतून समोर आणले होते. त्यानंतर आता पालिका प्रशासनाने करोना मृतांवर मोफत अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ५० हजार मुखपट्ट्या व रेमेडिसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे.

पनवेल तालुक्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या १८ हजारांवर पोहचली असून ४०१ जणांचा मृत्यू झाला आहे.  सध्या २४०० हून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत व घरातून उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील करोना रुग्णालयात प्राणवायू व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांचा तुडवडा असल्याच्या तक्रारी आहेत.

पालिकेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच झाली असून यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात पालिकेने गॅस दाहिनीवर अंत्यविधीसाठी २ हजार ५०० रुपये आणि गॅसदाहिणी बंद असल्यास लाकडांवर अंत्यविधी केल्यास ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मोफत अंत्यविधी पालिकेने करावा अशी मागणी नागरिकांच्या विविध सामाजिक व राजकीय प्रतिनिधींकडून करण्यात येत होती. लोकसत्ताने ‘पनवेलचे दुखणे’ ही वृत्त मालिका केली होती. यातही येथील नागरिकांनी मृत्यू महाग झाला असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

याशिवाय रेमेडिसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे.  यापूर्वी उपजिल्हा रुग्णालय व विविध कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमेडिसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे पालिकेने औषधांचा साठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेने घरोघरी जात नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५० हजार मुखपट्ट्यांची खरेदीही करण्यात येणार असल्याची माीहती स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी दिली.