लॉकडाउन लागू होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या गुरुवारी १२९७ वर पोहचली आहे. एका दिवसात महाराष्ट्रामध्ये १६२ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.  राज्याचा मृत्यूदर वाढला असून सहा टक्क्यांवर आला आहे. तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. करोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Blog

Highlights

    22:08 (IST)09 Apr 2020
    ब्रिटनमधील प्रसिद्ध भारतीय डॉक्टरचा करोनामुळं मृत्यू

    करोना विषाणूच्या संसर्गामुळे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे प्रसिद्ध डॉक्टर जितेंद्र कुमार राठोड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले, ते ६२ वर्षांचे होते. वेल्सच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. राठोड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. डॉ. राठोड यांनी सन १९७७ मध्ये मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते ब्रिटनला गेले तिथे त्यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) विभागात काम पाहिले.

    21:22 (IST)09 Apr 2020
    महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४, आत्तापर्यंत ९७ जणांचा मृत्यू

    महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आज महाराष्ट्रात २२९ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे ही संख्या वाढली आहे. करोनामुळे आज दिवसभरात २५ जणांचा मृत्यू झाला. आता राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १३६४ झाली आहे. आज जे २५ मृत्यू झाले त्यामध्ये १५ पुरुष तर १० महिला आहेत. २५ मृत रुग्णांपैकी १२ जण ६० वर्षांवरील वयाचे आहेत. मृतांपैकी ११ जण ४० ते ६० या वयोगटातले आहेत. तर मृतांमधले दोघेजण हे ४० वर्षांच्या खालील होते. २५ मृतांपैकी २१ जणांना मधुमेह, अस्थमा, हृदयविकार यांसारखे आजार होते असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. 

    21:20 (IST)09 Apr 2020
    वसई-विरार : अमेरिकेतून परतलेली ३४ वर्षीय महिला उपचारानंतर करोनामुक्त

    अमेरिकेहून वसईत परतलेली एक ३४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर २३ मार्चपासून तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. आता उपचारांनंतर ती पूर्णपणे बरी झाली असून तिचा करोनाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यांत आला आहे. दरम्यान, या महिलेस होम क्वारंटाइन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन बरी झालेली ही महिला वसई-विरारमधील पहिलीच व्यक्ती ठरली आहे.

    21:13 (IST)09 Apr 2020
    मिरा-भाईंदरमध्ये दिवसभरात दोन करोनाबाधितांचा मृत्यू, ७ नवे रुग्ण आढळले

    भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात गुरूवारी करोनाच्या ७ नव्या रुग्णांची भर पडली, तर दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील एकूण रुग्णाची संख्या २९ एवढी झाली आहे.

    21:09 (IST)09 Apr 2020
    पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोनाबाधित रुग्ण सापडला

    पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चोवीस तासात तीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ झाली आहे. यांपैकी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    20:51 (IST)09 Apr 2020
    मंत्रालयातून परवानगी घेऊन महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या उद्योजकावर कारवाई

    करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन असताना मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन एक बडा उद्योगपती आपल्या कुटुंबियांसह मुंबईतून महाबळेश्वरमध्ये दाखल झाला आहे. जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून आलेल्या या उद्योगपती व त्याच्या कुटुंबियांसह २३ जणांवर जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठी कारवाई केली आहे. सविस्तर वृत्त वाचा

    20:43 (IST)09 Apr 2020
    मुंबईत लॉकडाउन होणार कठोर, SRPF आणि ड्रोनचीही मदत घेणार : राजेश टोपे

    मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रातल्या संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या भागात आवश्यकता आहे तिथे लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात येतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा त्यांचं काम अगदी योग्य पद्धतीने करत आहेत. मात्र आता SRPF अर्थात राज्य राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण केलं जाईल. तसंच जे दाटीवाटीचे भाग आहेत तिथे ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

    20:03 (IST)09 Apr 2020
    कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३

    एकीकडे मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. अशात आता कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३ झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ४३ पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.

    19:44 (IST)09 Apr 2020
    पुणे : ससून रुग्णालयात आणखी तिघांचा मृत्यू; दिवसभरात ६ जणांनी गमावले प्राण

    पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात ६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिह्यातील मृतांचा एकूण आकडा २४ वर पोहोचला आहे. सकाळी ३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. यांपैकी एक जण बारामतीतील तर दुसरा पुणे महापालिका हद्दीतील होता. त्यानंतर संध्याकाळी ससून रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. आजवर पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

    17:49 (IST)09 Apr 2020
    Coronavirus: पुण्यात दिवसभरात तिघांचा मृत्यू; जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या २१वर

    पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिह्यातील मृतांचा एकूण आकडा २१वर पोहोचला आहे. सकाळी दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. यांपैकी एक जण बारामतीतील तर दुसरा पुणे महापालिका हद्दीतील होता. आजवर पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

    17:13 (IST)09 Apr 2020
    ८० हजार आयसोलेशन बेड

    भारतीय रेल्वे ८० हजार आयसोलेश बेड सज्ज ठेवणार आहे. रेल्वे ५ हजार डबे आयसोलेश वॉर्डमध्ये बदलणार आहे. त्यातले ३२५० डबे आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले आहेत.

    17:08 (IST)09 Apr 2020
    रेल्वेचे डॉक्टर, स्टाफही करणार मदत

    करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी रेल्वेने त्यांचे २५०० हजार डॉक्टर आणि ३५ हजार वैद्यकीय सहाय्यकांची फौज सज्ज ठेवली आहे. रेल्वेची सर्व रुग्णालयेही मदत कणार आहेत लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.


    17:00 (IST)09 Apr 2020
    ४९ हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर

    करोना व्हायरसपासून बचाव करणारी उपकरणे, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा सुरु झाला आहे. देशातीलच २० उत्पादक पीपीईची निर्मिती करणार आहेत. ४९ हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

    16:59 (IST)09 Apr 2020
    VIDEO: औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना बेदम मारहाण
    16:56 (IST)09 Apr 2020
    करोनाचे किती नवे रुग्ण, किती जणांचा मृत्यू

    संपूर्ण देशात आतापर्यंत ५,७३४ नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मागच्या २४ तासात ५४९ जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ४७३ जण करोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. करोना व्हायरसमुळे देशात १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. कालपासून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

    16:50 (IST)09 Apr 2020
    धक्कादायक! दुचाकीस्वाराने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला फरफटत नेलं, मुंबईतील घटना

    मुंबईतील डोंगरी येथे हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउन असतानाही रस्त्यांवर गाड्या काढून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून  डिमेलो रोडवर नाकाबंदी लावण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक धुरत यांना तिथे बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी तिथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीस्वाराने न थांबता पळून जाण्याच प्रयत्न केला. (सविस्तर वृत्त)

    16:34 (IST)09 Apr 2020
    भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ५७३४, आत्तापर्यंत १६६ मृत्यू

    भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ७३४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरात गेल्या २४ तासात करोनाचे ५४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १७ मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ४७३ लोकांना आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.

    16:16 (IST)09 Apr 2020
    Lockdown: पायी ३०० किमी चालावे लागलेल्या महिलेचा उपासमारीमुळे मृत्यू ?

    पायी चालत ३०० किलोमीटर अंतर कापणाऱ्या एका महिलेचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. शेजारच्या कर्नाटकातील बल्लारीमध्ये ही दुर्देवी घटना घडली. गंगम्मा असे या महिलेचे नाव असून ती बांधकाम मजूर होती. वाचा सविस्तर बातमी.

    15:51 (IST)09 Apr 2020
    आमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

    आमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला महाराष्ट्र कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. एप्रिल महिन्यापासूनच ही कपात होणार आहे.वर्षभरासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. आता महाराष्ट्र सरकारनेही आमदारांच्या वेतनातील कपातीला ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. यातून वाचणारा निधी करोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

    15:42 (IST)09 Apr 2020
    Lockdown: ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी झाले स्वच्छ

    करोनाची साथ देशभरात पसरली आहे. संपूर्ण जग या करोनाचा सामना करतं आहे. अशात काही सकारात्मक गोष्टीही समोर येत आहेत. आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी स्वच्छ झालं आहे. याआधी गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, पंचगंगा या नद्यांचंही पाणी स्वच्छ झालं आहे. या यादीत आता ब्रह्मपुत्रा नदीचीही भर पडली आहे.

    15:35 (IST)09 Apr 2020
    पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संचार

    पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्यात करोनाबाधित व्यक्तीने मुक्त संचार केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाणे निर्जंतुक करण्यात आले असून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र, त्यावेळी करोनाबाधित असल्याचे संबंधित व्यक्तीलाही माहिती नसल्याने नकळत तो पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

    15:27 (IST)09 Apr 2020
    इम्रान खान यांचं जगभरातील मुस्लिमांना आवाहन

    करोनाने थैमान घातलं असल्याने अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे लोकांच्या गर्दी करण्यावर निर्बंध आले असून लोकांना घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना घरात थांबूनच सण साजरे करण्यास सांगण्यात आलं  आहे. आज मुस्लिमांचा ‘शब्ब-ए-बारात’ सण असून यानिमित्ताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगभरातील मुस्लिमांना एक विनंती केली आहे. (सविस्तर बातमी)

    14:59 (IST)09 Apr 2020
    "भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर..."; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती समोर आली होती. विधान परिषदेची निवडणूक पुढे गेल्यानं त्यांना राज्यापालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे शिफारस करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

    14:57 (IST)09 Apr 2020
    'अब मेरे सवालों का जबाब दो!' - किरीट सोमय्या

    सध्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत दिल्लीत तबलिगींचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये सामिल झालेल्या काही तबलिगींना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंत बाहेर गेलेल्या तबलिगींमुळे करोनाच्या प्रसार वाढल्याचंही समोर आलं होतं. दरम्यान, यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून केंद्रात गृह मंत्रालयाने निजामुद्दी, दिल्लीमध्ये तबलिगी मरकजच्या इज्तेमाचं आयोजन करण्यासाठी परवानगी का दिली? अशा प्रकारचे आठ प्रश्न विचारले होते. त्यावर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांना काही प्रश्न विचारले आहेत.

    14:56 (IST)09 Apr 2020
    अनिल देशमुख 'ते' पत्रक खरं आहे का? माधव भांडारींचा सवाल

    कालपासून समाज माध्यमांवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवर लिहिण्यात आलेलं एक पत्रक फिरत आहे, सदर पत्रकाच्या सत्यतेबाबत साशंकता असून त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे देशमुख यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी मागणी करण्यासाठी एक परिपत्रक काढलं आहे.

    14:49 (IST)09 Apr 2020
    हेट स्पीच, अफवा पसवणाऱ्या ३५ जणांना अटक

    करोनाचा कहर देशात आणि महाराष्ट्रात सुरु आहे. लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशा सगळ्या वातावरणात हेट स्पीच, अफवा पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे याप्रकरणी आत्तापर्यंत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर २८ जणांचा शोध सुरु आहे. अशी माहिती बलसिंग राजपूत पोलीस अधीक्षक (सायबर विभाग) यांनी दिलं आहे. देश अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरा जातो आहे. अशात हेट स्पीच, अफवा पसरवण्याचे दुर्दैवी प्रकार घडत आहेत.

    चोवीस तासांमध्ये खोट्या बातम्या, अफवा आणि विद्वेशपूर्ण गोष्टी म्हणजेच हेट स्पीच चा प्रसार सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन माध्यमावर करणाऱ्या लोकांच्या विरोधात २० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची संख्या १३२ आहे आणि यापैकी ४९ या हेट स्पीच बाबत आहेत, अशी माहिती  राजपूत यांनी दिली.

    14:49 (IST)09 Apr 2020
    तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला केंद्र शासनाने परवानगी दिलीच कशी?-अनिल देशमुख

    तबलिगी मरकजच्या कार्यक्रमला केंद्र सरकारने कार्यक्रमासाठी परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे. अजूनही ६० लोक मोबाइल बंद करुन बसले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात या मरकजमुळेच करोनाचा प्रादुर्भाव वाढला असाही आरोप अनिल देशमुख यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला. तबलिगी मरकजच्या कार्यक्रमाला केंद्राने संमती दिलीच कशी? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

    14:30 (IST)09 Apr 2020
    सलाम! लॉकडाउनमुळे निराधार झालेल्या रुग्णाला डॉक्टरने स्वत:च्या हाताने भरवलं जेवण

    करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतामध्ये २५ मार्चपासून १४ एप्रिलदरम्यान २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तामिळनाडूमधील अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. त्यामुळेच तेथील नागरिकांनाही रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटता येत नाहीय. मात्र अशावेळी रुग्णलयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांची काळजी घेताना दिसत आहेत. द मद्रास मेडिकल मिशन हॉस्पीटलमधील असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एका वयस्कर रुग्णाला डॉक्टर स्वत:च्या हाताने जेवण भरवताना दिसत आहेत.येथे वाचा सविस्तर वृत्त

    14:13 (IST)09 Apr 2020
    उद्धव ठाकरेंचं ट्विट

    covidyoddha@gmail.com या इमेल आयडीवर आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे तुमच्यापैकी बर्‍याच जणांना “Address not found” असा संदेश मिळाला असेल. असे असल्यास, आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपल्या नोंदी पुन्हा पाठवाव्यात, आता ह्या समस्येचे निराकरण झाले आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

    14:03 (IST)09 Apr 2020
    पुढचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे… आदित्य ठाकरे

    मुंबईच्या अन्य भागांच्या तुलनेत जी दक्षिण वॉर्डमध्ये करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. वरळी, लोअर परेल आणि प्रभादेवीचा भाग जी दक्षिणमध्ये येतो. हा COVID-19 चा मुंबईतील हॉटस्पॉट आहे. चार एप्रिलला जी साऊथमध्ये ५८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. दुसऱ्या दिवशी हा आकडा ६८ पर्यंत वाढला. सहा एप्रिलला ही संख्या ७८ झाली. बुधवारी या भागातील करोना बाधितांची संख्या १३३ पर्यंत पोहोचली. वाचा सविस्तर बातमी.

    14:00 (IST)09 Apr 2020
    पुण्यातील मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला बाजार अनिश्चित काळासाठी बंद

    पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत करोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर  पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला, कांदा-बटाटा, फळे, केळी बाजार उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद.

    13:31 (IST)09 Apr 2020
    “तुम्ही फक्त आवाज द्या, हा सिंघम खाकी घालून मैदानात उतरेल”, अजय देवगणचं मुंबई पोलिसांना आवाहन

    करोनाशी सामना करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी पुढे येत असून आर्थिक मदत करत आहेत. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहेत. यासोबतच जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांचे आभार मानत आहेत. सेलिब्रेटी घऱात थांबून सहकार्य करत आर्थिक मदत देत असताना अभिनेता अजय देवगणने पोलिसांसोबत रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे. अजय देवगणने तसं ट्विटच केलं आहे. (सविस्तर बातमी)

    13:22 (IST)09 Apr 2020
    '२१ दिवस आम्ही घरी असतो तर...', मुंबई पोलिसांची उत्तरं ऐकून तुम्ही किती नशिबवान आहात हे समजेल

    २१ दिवसांचा लॉकडाउन तुम्हाला खूप मोठा वाटतोय का? मात्र आम्ही या २१ दिवसात घरी असतो तर काय केलं असतं तुम्हाला पहायचंय का?, असं म्हणत मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात 'ऑन ड्युटी' असणाऱ्या पोलिसांनी २१ दिवसात काय केलं असतं यासंदर्भातील आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. अर्थात आपल्यासारख्या घरात बसलेल्यांना या इच्छा अगदीच साध्या वाटतील मात्र खरोखरच पोलिसांनी व्यक्त केलेल्या इच्छा ऐकून आपण किती नशिबवान आहोत याची जाणीव होईल. येथे क्लिक करुन पाहा व्हिडिओ

    13:05 (IST)09 Apr 2020
    महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांची संख्या १२९७ वर

    करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ३८१ परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांची संख्या १२९७ वर पोहोचली आहे.

    12:36 (IST)09 Apr 2020
    ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवला

    देशभरात सध्या एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लॉकडाउनच्या निर्णयाच काय होणार? करोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

    12:24 (IST)09 Apr 2020
    मुंबईत ८२ वर्षीय महिलेने करोना व्हायरसवर केली मात

    मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी एक ८२ वर्षीय महिला करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी परतली आहे. भारतात साठ-पासष्ट आणि त्यापुढच्या वयोगटातील नागरिकांचे करोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. वयाची ८० ओलांडलेल्या महिलेने करोना व्हायरसवर मात करणे, हे सकारात्मक संकेत असून इतरांसाठी एक आशेचा किरण आहे. वाचा सविस्तर बातमी.

    11:54 (IST)09 Apr 2020
    कोल्हापूर जिल्ह्यात पाचवा करोनाग्रस्त आढळला

    कोल्हापूरमधील  उचत (ता. शाहूवाडी) येथील 34 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  शाहूवाडीतील हा पहिला तर जिल्ह्यातील पाचवा करोनाग्रस्त आहे. जिल्हा वैद्यकीय पथक संबंधित परिसरात रवाना झाले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरु आहे. मलकापूरपासून पांढरेपाणीकडे जाणाऱ्या मार्गावर उचत हे गाव आहे.

    11:42 (IST)09 Apr 2020
    महाराष्ट्रावर करोनानंतर आता ‘सारी’चं संकट, औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी

    राज्यावर सध्या करोनाचं संकट असून त्याचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा संकट सामना करताना सध्या एक नवं संकट समोर आलं आहे. औरंगाबादमध्ये करोनासोबत ‘सारी’चा (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) आजार पसरत आहे. या आजारामुळे औरंगाबादमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

    11:37 (IST)09 Apr 2020
    पंतप्रधान मोदींनी दिला ट्रम्प यांच्या टि्वटला प्रतिसाद

    डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं टि्वट केलं. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला आहे. "तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. अशाच परिस्थितीत मित्र जास्त जवळ येतात. भारत-अमेरिका मैत्री पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झाली आहे. करोना व्हायरस विरोधी या लढयात मानवतेच्या दृष्टीकोनातून भारत शक्य असेल ती सर्व मदत करेल" असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

    11:35 (IST)09 Apr 2020
    राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२९७; एकदा दिवसात आढळले १६२ नवे रुग्ण

    मागील २४ तासात राज्यात करोनाचे १६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे.

    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Coroanavirus live update latest news update in india and maharashtra
    First published on: 09-04-2020 at 07:19 IST