X
X

CoronaVirus/Lockdown Update: महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४, आत्तापर्यंत ९७ जणांचा मृत्यू

CoroanaVirus/Lockdown In India: करोना आणि लॉकडाउन संदर्भातील ताजी माहिती वाचा एकाच ठिकाणी

लॉकडाउन लागू होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या गुरुवारी १२९७ वर पोहचली आहे. एका दिवसात महाराष्ट्रामध्ये १६२ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.  राज्याचा मृत्यूदर वाढला असून सहा टक्क्यांवर आला आहे. तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. करोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.

Live Blog

Highlights

22:08 (IST)09 Apr 2020
ब्रिटनमधील प्रसिद्ध भारतीय डॉक्टरचा करोनामुळं मृत्यू

करोना विषाणूच्या संसर्गामुळे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे प्रसिद्ध डॉक्टर जितेंद्र कुमार राठोड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले, ते ६२ वर्षांचे होते. वेल्सच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. राठोड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. डॉ. राठोड यांनी सन १९७७ मध्ये मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते ब्रिटनला गेले तिथे त्यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) विभागात काम पाहिले.

21:22 (IST)09 Apr 2020
महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४, आत्तापर्यंत ९७ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आज महाराष्ट्रात २२९ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे ही संख्या वाढली आहे. करोनामुळे आज दिवसभरात २५ जणांचा मृत्यू झाला. आता राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १३६४ झाली आहे. आज जे २५ मृत्यू झाले त्यामध्ये १५ पुरुष तर १० महिला आहेत. २५ मृत रुग्णांपैकी १२ जण ६० वर्षांवरील वयाचे आहेत. मृतांपैकी ११ जण ४० ते ६० या वयोगटातले आहेत. तर मृतांमधले दोघेजण हे ४० वर्षांच्या खालील होते. २५ मृतांपैकी २१ जणांना मधुमेह, अस्थमा, हृदयविकार यांसारखे आजार होते असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. 

21:20 (IST)09 Apr 2020
वसई-विरार : अमेरिकेतून परतलेली ३४ वर्षीय महिला उपचारानंतर करोनामुक्त

अमेरिकेहून वसईत परतलेली एक ३४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर २३ मार्चपासून तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. आता उपचारांनंतर ती पूर्णपणे बरी झाली असून तिचा करोनाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यांत आला आहे. दरम्यान, या महिलेस होम क्वारंटाइन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन बरी झालेली ही महिला वसई-विरारमधील पहिलीच व्यक्ती ठरली आहे.

21:13 (IST)09 Apr 2020
मिरा-भाईंदरमध्ये दिवसभरात दोन करोनाबाधितांचा मृत्यू, ७ नवे रुग्ण आढळले

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात गुरूवारी करोनाच्या ७ नव्या रुग्णांची भर पडली, तर दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील एकूण रुग्णाची संख्या २९ एवढी झाली आहे.

21:09 (IST)09 Apr 2020
पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोनाबाधित रुग्ण सापडला

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चोवीस तासात तीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ झाली आहे. यांपैकी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

20:51 (IST)09 Apr 2020
मंत्रालयातून परवानगी घेऊन महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या उद्योजकावर कारवाई

करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन असताना मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन एक बडा उद्योगपती आपल्या कुटुंबियांसह मुंबईतून महाबळेश्वरमध्ये दाखल झाला आहे. जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून आलेल्या या उद्योगपती व त्याच्या कुटुंबियांसह २३ जणांवर जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठी कारवाई केली आहे. सविस्तर वृत्त वाचा

20:43 (IST)09 Apr 2020
मुंबईत लॉकडाउन होणार कठोर, SRPF आणि ड्रोनचीही मदत घेणार : राजेश टोपे

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रातल्या संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या भागात आवश्यकता आहे तिथे लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात येतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा त्यांचं काम अगदी योग्य पद्धतीने करत आहेत. मात्र आता SRPF अर्थात राज्य राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण केलं जाईल. तसंच जे दाटीवाटीचे भाग आहेत तिथे ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

20:03 (IST)09 Apr 2020
कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३

एकीकडे मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. अशात आता कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३ झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ४३ पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.

19:44 (IST)09 Apr 2020
पुणे : ससून रुग्णालयात आणखी तिघांचा मृत्यू; दिवसभरात ६ जणांनी गमावले प्राण

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात ६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिह्यातील मृतांचा एकूण आकडा २४ वर पोहोचला आहे. सकाळी ३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. यांपैकी एक जण बारामतीतील तर दुसरा पुणे महापालिका हद्दीतील होता. त्यानंतर संध्याकाळी ससून रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. आजवर पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

17:49 (IST)09 Apr 2020
Coronavirus: पुण्यात दिवसभरात तिघांचा मृत्यू; जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या २१वर

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिह्यातील मृतांचा एकूण आकडा २१वर पोहोचला आहे. सकाळी दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. यांपैकी एक जण बारामतीतील तर दुसरा पुणे महापालिका हद्दीतील होता. आजवर पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

17:13 (IST)09 Apr 2020
८० हजार आयसोलेशन बेड

भारतीय रेल्वे ८० हजार आयसोलेश बेड सज्ज ठेवणार आहे. रेल्वे ५ हजार डबे आयसोलेश वॉर्डमध्ये बदलणार आहे. त्यातले ३२५० डबे आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले आहेत.

17:08 (IST)09 Apr 2020
रेल्वेचे डॉक्टर, स्टाफही करणार मदत

करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी रेल्वेने त्यांचे २५०० हजार डॉक्टर आणि ३५ हजार वैद्यकीय सहाय्यकांची फौज सज्ज ठेवली आहे. रेल्वेची सर्व रुग्णालयेही मदत कणार आहेत लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

17:00 (IST)09 Apr 2020
४९ हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर

करोना व्हायरसपासून बचाव करणारी उपकरणे, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा सुरु झाला आहे. देशातीलच २० उत्पादक पीपीईची निर्मिती करणार आहेत. ४९ हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

16:59 (IST)09 Apr 2020
VIDEO: औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना बेदम मारहाण
16:56 (IST)09 Apr 2020
करोनाचे किती नवे रुग्ण, किती जणांचा मृत्यू

संपूर्ण देशात आतापर्यंत ५,७३४ नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मागच्या २४ तासात ५४९ जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ४७३ जण करोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. करोना व्हायरसमुळे देशात १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. कालपासून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

23
X