लॉकडाउन लागू होऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात (८.३३ टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल पंजाब (७.८९ टक्के)आणि हिमाचल प्रदेश (७.६९ टक्के ) या राज्यांची नोंद असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे. गर्दी कमी झाली असली, तरी संसर्ग होण्याचा वेग कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Blog

Highlights

    22:02 (IST)08 Apr 2020
    पुणे ठरलं करोनाचा हॉटस्पॉट; दिवसभरात १० बाधित रुग्णांचा मृत्यू

    पुणे शहर हे राज्यातीलच नव्हे देशातील करोनाच्या संसर्गाचा हॉटस्पॉट बनलं आहे. कारण, बुधवारी दिवसभरात करोनाच्या दहा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी शहरात सकाळी विविध रुग्णालयांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संध्याकाळी त्यात आणखी तीन जणांचा समावेश झाला. त्यानंतर रात्री उशीरा दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

    21:44 (IST)08 Apr 2020
    Corona virus: खासगी लॅबमध्येही चाचणी होणार मोफत-सुप्रीम कोर्ट

    देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशात सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. आता खासगी लॅबमध्येही लोक मोफत करोनाची चाचणी करु शकतात. आधी खासगी लॅबमध्ये करोनाच्या टेस्टसाठी ४ हजार ५०० रुपयांपर्यंतचे शुल्क आकारण्यास संमती होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे खासगी लॅबमध्येही चाचणी मोफत होईल असं म्हटलं आहे.

    21:14 (IST)08 Apr 2020
    वसईत करोनाबाधीत रुग्णांची संख्या २८, दिवसभरात ४ नवीन रुग्ण

    वसई : बुधवारी वसईत ४ नव्या करोनाबाधीत रुग्णांची नोंद झाल्याने वसईतील एकूण रुग्णसंख्या २८ एवढी झाली आहे. बुधवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये वसईतील मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या पत्नीचा समावेश आहे. तर नालासोपारा मधील करोना असलेल्या रुग्णाच्या पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.

    21:12 (IST)08 Apr 2020
    लॉकडाउनच्या काळातही तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची वर्दळ नेहमीप्रमाणेच सुरू

    जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन तसेच सलग उत्पादन प्रक्रिया करण्याच्या उद्योगांना राज्य सरकारने दिलेल्या मुभेचा गैरफायदा घेऊन तारापूर मधील अनेक उद्योगाने उत्पादन सुरू करण्याची परवानगी प्राप्त केली आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमधील विविध रस्त्यांवर सकाळी व सायंकाळी पूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ लागली आहे. विशेष करून बोईसर बाहेरून येणाऱ्या कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने अशा नागरिकांकडून करोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    21:11 (IST)08 Apr 2020
    सोलापुरात द्राक्षबागेत काम करून गेलेल्या मजुराला करोनाची बाधा

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात करोना विषाणूची बाधा झालेला एकही रूग्ण आतापर्यंत आढळून आला नाही. परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगावात द्राक्षबागेत काम करून गावी परतलेल्या एका परप्रांतीय मजुराला करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे.

    21:06 (IST)08 Apr 2020
    बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर मशिदींमधून २४ जण तपासणीसाठी पुढे

    दिल्लीतील निजामुद्दीन मरकजला जावून आलेल्या किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी चोवीस तासांचा स्वतःहून समोर न आल्यास पोलीस कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला होता. कारवाईचा बडगा उगारताच बुधवारी शहरातील दोन मशिदींमधून परराज्यातून आलेले २४ जण तपासणीसाठी पुढे आले आहेत. मात्र, मरकजमधील धार्मिक कार्यक्रमाशी त्यांचा संबंध नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

    19:48 (IST)08 Apr 2020
    तबलिगी मरकज : राज्याच्या गृहमंत्र्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांकडे मागितली आठ प्रश्नांची उत्तरे

    देशभरात करोनाचा फैलाव वाढतो आहे. अशातच दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली. तबलिगी जमातने माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप झाले. आता याच सगळ्या प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आठ प्रश्न विचारले आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं अमित शाह देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    19:46 (IST)08 Apr 2020
    पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोनाबाधित रुग्ण आढळला

    पिंपरी-चिंचवड शहरात आणखी एकजण करोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं असून त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांचा आकडा २१ वर पोहचला आहे. तर एकावर करोना पॉझिटिव्ह रुग्णावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

    19:44 (IST)08 Apr 2020
    बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार; पुस्तकं वेबसाईटवर उपलब्ध

    राज्यातील संचारबंदीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य 'पीडीएफ' स्वरुपात बालभारतीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार असून विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करू शकतील. सविस्तर वृत्त वाचा

    19:31 (IST)08 Apr 2020
    पुणे विद्यापीठातील संशोधक करोना संक्रमणाचे गणिती प्रारूप करणार तयार

    पुणे : संचारबंदी लागू होण्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन' विभागाच्या डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ. स्नेहल शेकटकर यांनी साथीचा रोग कसा पसरेल याचे नवे गणितीय प्रारूप (मॉडेल) तयार करून देशांतर्गत वाहतूक कशी बंद करणे महत्वाचे आहे हे दाखवून दिले होते. त्याची दखल घेऊन अखिल भारतीय शास्त्रज्ञांच्या समुहात समावेश करून पुढील गणितीय प्रारुपे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

    19:19 (IST)08 Apr 2020
    कोल्हापूरात प्रतिष्ठित व्यक्तींचा मॉर्निंग वॉकसाठी आग्रह; पोलिसांनी सुनावले खडे बोल

    कोल्हापूर : करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाउन असतानाही पहाटे मॉर्निंगवॉकसाठी रस्त्यावर येण्याचा अट्टाहास कोल्हापुरात काही जणांकडून होत आहे. अशांना खडे बोल सुनावून सामाजिक भान ठेवण्याचे काम बुधवारी पोलिसांनी केले. त्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असून पोलिसांनी सुनावल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

    18:32 (IST)08 Apr 2020
    मला माफ करा, पण त्याशिवाय पर्याय नव्हता – उद्धव ठाकरे

    करोना व्हायरसला पराभूत करण्यासाठी लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वेळेबरोबर सगळया गोष्टी सुरळीत होतील असा आशावाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. वाचा सविस्तर बातमी.

    18:30 (IST)08 Apr 2020
    पुण्यात आणखी तीन करोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

    पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढतच चालले आहे. बुधवारी सकाळी पाच बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते त्यानंतर संध्यकाळी सहा वाजण्याच्या सुमारात आणखी तीन करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा ८वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांची संख्या १६ झाली आहे.

    18:29 (IST)08 Apr 2020

    deleting_message

    18:29 (IST)08 Apr 2020

    deleting_message

    18:14 (IST)08 Apr 2020
    राज्यातल्या करोनाबाधितांची संख्या ११३५, महाराष्ट्र अद्याप स्टेज ३ मध्ये नाही-राजेश टोपे

    महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या ११३५ वर पोहचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. आजपर्यंत १२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडावं लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी काटेकोरपणे पाळावं असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अगदी कॉटनचा मास्क वापरलात तरीही चालेल मात्र वापरणं सक्तीचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    17:42 (IST)08 Apr 2020
    जम्मू-काश्मीरमध्ये करोनाचे १४ नवे रुग्ण

    जम्मू-काश्मीरमध्ये १४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात काश्मीरमध्ये ११ आणि जम्मूमध्ये तीन रुग्ण आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये करोना व्हायरसची एकूण १३९ जणांना बाधा झाली. जम्मूमध्ये २७ आणि काश्मीरमध्ये १०३ रुग्ण आहेत. एसकेआयएमएस रुग्णालयातून करोनामधून बऱ्या झालेल्या दोन जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    17:14 (IST)08 Apr 2020
    नागरिकांच्या Covid-19 च्या चाचण्या मोफत करा, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

    सर्व नागरिकांची Covid-19 ची चाचणी मोफत झाली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न करा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिला. सध्या खासगी प्रयोगशाळांना करोना व्हायरसच्या चाचणीसाठी ४,५०० हजार रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी.

    16:57 (IST)08 Apr 2020
    धक्कादायक! गरीबांच्या अन्नावर श्रीमंतांचा डल्ला, घर बसल्या मागवत आहेत फूड पॅकेट

    राजस्थानमधील रायपूर नगरपालिकेच्यावतीने पुरवण्यात येणाऱ्या या जेवणाच्या पाकिटांची मागणी श्रीमंत लोकांकडूनही होत असल्याचे मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. येथील १० ते १५ लोक पालिकेच्या हेल्पलाइनवर फोन करुन जेवणाच्या पाकिटांची मागणी करत आहेत.येथे वाचा सविस्तर वृत्त

    16:44 (IST)08 Apr 2020
    पंतप्रधान ११ एप्रिलला सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ एप्रिलला म्हणजेच शनिवारी देशातल्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत करोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. आता १४ एप्रिल ही तारीख जवळ येते आहे. त्या पार्श्वभूमीवर काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    16:36 (IST)08 Apr 2020
    मास्क न घातल्यास होणार अटक, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

    करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून मास्क बंधनकारक केलं आहे. यासंबंधीचा निर्णय महापालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे मास्क न घालणाऱ्यांना दंड ठोठावला जाऊ शकतो. तसंच अटकही केली जाऊ शकते. (सविस्तर बातमी)

    16:07 (IST)08 Apr 2020
    वुहानला ७० दिवस लागले…महाराष्ट्राला किती? जाणून घ्या काय म्हणाले उद्धव ठाकरे; १७ महत्त्वाचे मुद्दे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत राज्यात सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर काय परिस्थिती आहे याची माहिती दिली. यावेळी त्यांनी जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन करत चिंता करा पण घाबरुन जाऊ नका असं आवाहन केलं. तसंच मुंबई-पुण्यात घरोघरी चाचण्यांची संख्या वाढवतोय. जलद चाचणी, वैद्यकीय उपकरणे आम्ही प्रमाणित करून घेतोय शी माहिती देताना सध्या ८० जण बरे होऊन घरी गेले असून ६४ मृत्यू झाले असल्याचं सांगितलं. (काय आहेत हे मुद्दे)

    15:53 (IST)08 Apr 2020
    Coronavirus : पुण्यात आणखी एकाचा मृत्यू, सकाळपासून सहा बळी

    पुण्यातील फातिमानगर भागातील इनामदार रुग्णालयात  दाखल  करण्यात आलेल्या  57 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.  स्वॅब टेस्ट नंतर या महिलेस करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता  इनामदार रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांना होम कॉरंटाइन करण्यात आले आहे. पुण्यातील मृतांचा आकडा आता 14 झाला आहे.

    15:51 (IST)08 Apr 2020
    करोना : मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती हल्ला

    मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सरकारची स्थिती अनिर्णायकी आहे. मंत्रिमंडळातील मंत्री काय करतात याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्ता नसतो तर मुख्यमंत्री काय सांगतात त्याकडे मंत्र्यांचे लक्ष नसते, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

    15:44 (IST)08 Apr 2020
    “१४ एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच केले स्पष्ट”

    करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही भारतात करोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की १४ एप्रिलला संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे. पंतप्रधानांनी १४ तारखेनंतर लगेचच पूर्णपणे लॉकडाउन हटवणार नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते. (सविस्तर बातमी)

    15:32 (IST)08 Apr 2020
    मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद; मात्र लॉकडाउनबद्दल संभ्रमावस्था कायम

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला. मात्र लॉकडाउनचं काय? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. लॉकडाउन वाढणार की नाही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे लॉकडाउनबाबत संभ्रमावस्था कायम आहे. आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक, ट्विटर आणि यू ट्युबच्या माध्यमातून संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला मात्र त्यातून लॉकडाउन संपण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

    15:22 (IST)08 Apr 2020
    आज मध्यरात्रीपासून उत्तर प्रदेशातील १५ जिल्हे होणार पूर्णपणे बंद

    करोना व्हायरसचे रुग्ण असलेले उत्तर प्रदेशातील १५ जिल्हे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनची अत्यंत कठोरतेने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने तसे आदेश दिले आहेत. आज मध्यरात्रीपासून पुढच्या १३ एप्रिलपर्यंत या लॉकडाउनची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. या १५ जिल्ह्यांमध्ये हालाचालींवर आणखी निर्बंध येणार आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येतील.

    15:09 (IST)08 Apr 2020
    उद्धव ठाकरेंच्या भाषणात अमेरिकेने मागितलेल्या मदतीचा उल्लेख, म्हणाले….

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माधम्यातून जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्या असलेल्या परिस्थितीवर तसंच काय काळजी घेतली पाहिजे यावर माहिती दिली. करोना आपल्या मागे हात धुवून लागला आहे. तुम्ही घरी बसून गैरसोय होत आहे याची मला कल्पना आहे सांगताना उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्ती केली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात यावेळी अमेरिकेकडून भारताकडे मागण्यात आलेल्या मदतीचा उल्लेख केला. (सविस्तर बातमी)

    14:51 (IST)08 Apr 2020
    न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी मोडला लॉकडाउनचा नियम; पंतप्रधानांनी केली कारवाई

    न्यूझीलंडमध्येही करोनाचे ९६९ रुग्ण अढळले असून देशात करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन à¤¯à¤¾à¤‚नी काही भागांमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाउनची घोषणा केलेली असतानाच देशाचे आरोग्यमंत्र्यांनीच नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंतप्रधानांनी आरोग्यमंत्र्यांवर कारवाई केली आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

    14:43 (IST)08 Apr 2020
    Coronavirus: टि्वटरचा सीईओ करणार साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

    ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी करोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक बिलीयन डॉलर (अंदाजे ७ हजार ६२० कोटी) मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. डॉर्सी यांनी यासाठी स्क्वेअर इन, या कंपनीमधील त्यांची मालकी हक्क विकून पैसे उभे करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

    14:33 (IST)08 Apr 2020
    करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने कारलाच बनवले घर, मुख्यमंत्र्यांनीही केला सलाम

    करोनाची लागण झालेल्यांवर उपचार करणारे अनेक डॉक्टर, नर्स आपआपल्या कुटुंबियांपासून दूर राहतायेत. घरातील कोणाला संसर्ग होऊ नये या भीतीमुळे काही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी रुग्णालयातील ड्युटी संपल्यानंतरही घरी जात नाहीत. भोपाळच्या जे.पी. हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने तर स्वतःच्या कारलाच घर बनवलंय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या डॉक्टरला सलाम ठोकलाय. (वाचा सविस्तर)

    14:17 (IST)08 Apr 2020
    संचारबंदी असतानाही मिरा रोड परिसरात नागरिक नाश्ता करायला रस्त्यावर

    मिरा रोड भागातील पूनम सागर परिसरात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिक बुधवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी घराबाहेर पडल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे मिरा रोड परिसरात करोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाही इथल्या काही नागरिकांना याचे गांभीर्य नाही तसेच त्यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. सविस्तर वृत्त वाचा

    14:13 (IST)08 Apr 2020
    पिंपरी-चिंचवडमधील चार भाग आज मध्यरात्रीपासून होणार सील

    पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून शहरातील काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. शहरातील करोना बाधितांची संख्या वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सविस्तर बातमी वाचा

    13:56 (IST)08 Apr 2020
    महाराष्ट्राला तुमची गरज आहे


    लष्करात वैद्यकीय सेवा बजावलेल्या व्यक्तींना करोनाग्रस्तांवर उपचारासाठी मदत करायची असेल त्यांनी Covidyoddha@gmail.com वर संपर्क करा. महाराष्ट्राला तुमची गरज आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

    13:49 (IST)08 Apr 2020
    चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी


    सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे ज्यांना असतील त्यांनी क्युअर क्लिनिकमध्ये जावे, प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडी जास्त करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल. ज्यांना तीव्र लक्षणे आणि उच्च रक्तदाब व अन्य आजार असतील, त्यांच्यासाठी तिसर रुग्णालय असेल.

    13:49 (IST)08 Apr 2020
    करोनानंतर अर्थव्यवस्थेचं युद्ध : उद्धव ठाकरे

    सध्या करोनानं थैमान घातलं आहे. याचा आकडा वाढतोय. पण तो आपल्याला कमी करायचा आहे आणि आपण तो नक्की कमी करू. आपण करोनावर नक्कीच विजय मिळवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना घरात थांबण्याच्या सुचना केल्या. तसंच आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जनतेला व्यायाम करण्याचा सल्ला दिला. करोनाच्या युद्धानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेचं युद्धही लढायचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

    13:43 (IST)08 Apr 2020
    करोनाच्या मागे आपण 'हात धुवून लागलो आहोत' संकट संपणारच: उद्धव ठाकरे

    सध्या राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. आपण सगळेजण एकसंध कसे राहात आहोत हे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे ही बाब चिंतेची आहे. करोना आपल्या मागे लागला आहे. मात्र करोनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही. घरात राहूनही आपली जनता तणावमुक्त कशी राहिल हे वृत्तवाहिन्यांनी पहावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला.

    13:42 (IST)08 Apr 2020
    रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब - मुख्यमंत्री

    सध्या राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. आपण सगळेजण एकसंध कसे राहात आहोत हे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे ही बाब चिंतेची आहे. करोना आपल्या मागे लागला आहे. मात्र करोनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही. घरात राहूनही आपली जनता तणावमुक्त कशी राहिल हे वृत्तवाहिन्यांनी पहावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला.

    13:38 (IST)08 Apr 2020
    करोनानंतर अर्थव्यवस्थेशी लढायचं आहे - उद्धव ठाकरे


    करोनानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेशी लढायचं आहे. वुहानमध्ये निर्बंध हटवण्यात आले आहेत. ही दिलासा देणारी बातमी आहे. आपण दक्षतेने सामना केला तरी ही वेळ लवकर निघून जाईल.

    13:35 (IST)08 Apr 2020
    घरी राहून तंदुरुस्त राहा - उद्धव ठाकरे


    अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. चार आठवडयात करोनाग्रस्तांच्या आकडयामध्ये वाढ झाली आहे. घरी राहून त्यांनी नागरिकांना तंदुरुस्त राहण्याचे आवाहन केले आहे.

    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Coroanavirus lockdown in india coronavirus covid 19 and lockdown live update letest news about coronavirus and lockdown
    First published on: 08-04-2020 at 07:35 IST