जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात करोनाबाधित रुग्णाचा १३ मे रोजी मृत्यू झाला होता. मृताचा करोना तपासणी अहवाल  रविवारी पॉझिटिव्ह आल्याने मूर्तिजापूर शहरात खळबळ उडाली आहे. अकोला शहरात रुग्ण वाढीचे सत्र सुरूच असून काल तब्बल ३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८ जणांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २५७ वर पोहोचली. सध्या १२२ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरासह जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. रविवारी दिवसभरात एक मृत्यू व ३७ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण १७६ तपासणी अहवाल काल प्राप्त झाले. त्यापैकी १३९ अहवाल निगेटिव्ह , तर ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील १८ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत ११७ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १२२ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा- बुलढाणा जिल्ह्यात आणखी तीन करोनाबाधित

दरम्यान, मूर्तिजापूर येथे १३ मे रोजी एका ४८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने उपचारासाठी मूर्तिजापूरवरून अकोल्याला पाठविण्यात आले होते. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. करोनाचा संशय असल्याने नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये मूर्तिजापूर येथील त्या मृताचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मूर्तिजापूरमधील पठाणपुऱ्यासह जुनी वस्ती संपूर्णत: प्रतिबंधित करण्यात आली आहे. जवळून संपर्कात आलेल्या सुमारे ४० जणांना शासकीय तंत्रनिकेतमधील वसतिगृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा- वर्धा : चार नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ३२ जण करोनाबाधित आढळून आले. त्यामध्ये १० महिला व २२ पुरुष आहेत. एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. तारफैल, माळीपूरा, खैर मोहम्मद प्लॉट येथील प्रत्येकी चार, आंबेडकर नगर, ताजनापेठ, अकोट फैल प्रत्येकी तीन, मूर्तिजापूर, अगरवेस, बिर्ला गेट जठारपेठ, खरप, काळा मारोती, जुना आळशी प्लॉट, वर्धमान डूप्लेक्स राजपूतपूरा, रामदासपेठ पोलीस वसाहत, नायगाव, खोलेश्वर व शास्त्री नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी आणखी पाच रुग्णांची भर पडल्याने काल दिवसभरात एकूण ३७ रुग्ण वाढले. सायंकाळच्या अहवालातील पाच करोनाबाधितांमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. त्यातील तीन जण फिरदोस कॉलनी, अकोट फैल व डाबकी रोड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अकोल्यातील आणखी १७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

आणखी वाचा- गडचिरोली : संस्थात्मक क्वारंटाइनमधील तिघांचे नमुने पॉझिटीव्ह

१९ व २० रोजी संपूर्ण टाळेबंदी
अकोला शहरासह जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १९ व २० मे रोजी संपूर्ण टाळेबंदी करण्यात येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिले. ३१ मेपर्यंत टाळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. यामध्ये जीवनावश्यक सेवेसाठी सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. त्यामध्ये बदल करून ती वेळ सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

मूर्तिजापूर येथे अंत्यविधीला होती गर्दी
मूर्तिजापूर येथील मृत्यू झालेल्या व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या व्यक्तीचा अहवाल येण्याअगोदर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला होती. मूर्तिजापूर येथे अंत्यविधीला अनेकांनी हजेरी लावून गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण झाले असून, संसर्गाचा धोका वाढला आहे.