पोलादपूर शहरात करोनाची लागण झालेल्या ६३ वर्षीय महिलेचा आज (रविवार) दुपारी १२ वाजता मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू झाला. लाॅकडउनच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुक्यातील चाकरमान्यांमुळे या दोन्ही तालुक्यात करोनाचा धोका निर्माण झाला असल्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरांच्या ठिकाणाहून महाड पोलादपूर तालुक्यात सध्या स्थलांतर झालेल्या या चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

लाॅकडउनच्या काळात पंधरा दिवसांपासून महाड तालुक्यात साडेबारा हजार तर पोलादपूर तालुक्यात साडेनऊ हजारांपेक्षा जास्त चाकरमानी विविध शहरातून आपल्या मुळ गावी परतले आहेत. मुंबईतून पोलादपूर शहरात आलेल्या अशाच एका कुटुंबातील ६३ वर्षीय महिलेला  करोनाची लागण झाली व त्या महिलेवर मुंबईतील कस्तूरबा रूग्णालयात उपचार सुरू असताना आज दुपारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती पसरताच महाड पोलादपूर तालुक्यात घबराट पसरली आहे.

या महिलेला तीन दिवसांपूर्वी महाड शहरातील आदित्य नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते.त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तूरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी तिचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.  महिला रहात होती त्या पोलादपूर प्रभातनगर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.