News Flash

Coronavirus : महाबळेश्वरच्या पर्यटनाला करोना आणि अफवांचा फटका

पर्यटकांनी पाठ फिरवल्याने येथील सर्व व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. या पर्यटनस्थळावरील सर्वात गजबजलेला भाग असणारा प्रसिद्ध वेण्णा तलाव सध्या निर्मनुष्य झाला आहे. (छाया - संजय दस्तुरे)

वाई : ऐन हंगामात महाबळेश्वर-पाचगणीच्या पर्यटनाला करोना आणि त्याच्यासंदर्भात  पसरलेल्या अफवांचा फटका बसला असून नेहमी पर्यटकांनी गजबजलेले हे पर्यटनस्थळ सध्या रिकामे झाले आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्याने येथील सर्व व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

पाचगणी, महाबळेश्वर ही दोन्ही पर्यटनस्थळे नेहमी गजबजलेली असतात. अचानक करोनाचे संकट धडकले आणि पूर्ण पर्यटन व्यवसायच कोलमडून गेल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. सुटय़ांच्या काळातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

मार्च महिन्याचा परीक्षांचा हंगाम संपताना एप्रिल व मे महिन्यासाठी पर्यटक  आगाऊ आरक्षण करीत असतात. करोनाचा संसर्ग मोठय़ा शहरात दिसत असल्याने येणारे पर्यटक सध्या ‘थांबा व पाहा’ च्या भूमिकेत आहेत. करोनाच्या भीतीने बरेच पर्यटक आपले आगाऊ आरक्षणे रद्द करीत आहेत. या आजाराचा नवीन आरक्षणावरही परिणाम जाणवला आहे. त्यामुळे हॉटेल व लॉज व्यावसायिक हैराण झाले आहेत.

महाबळेश्वर पाचगणीत पुण्या-मुंबईतील पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. परंतु या दोन्हीही शहरात करोनाचे रूग्ण आढळल्याने तिथले नागरिक बाहेर पडण्यास धास्तावले आहेत. याशिवाय पाचगणीत असलेल्या अनेक निवासी शाळांच्या परीक्षांचा हंगाम या काळातच संपतो. या पाल्यांना घेण्यासाठी देशभरातून आलेले पालक एरवी महाबळेश्वर पाचगणीत थांबत पर्यटनाचा आनंद घेत घरी परततात. परतु यंदा करोनाच्या भीतीने या पालकवर्गानेही महाबळेश्वरकडे पाठ फिरवली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये सध्या सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. या पर्यटनस्थळावरील सर्वात गजबजलेला भाग असणारा प्रसिद्ध वेण्णा तलाव सध्या निर्मनुष्य झाला असून सजलेली बाजारपेठही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने येथील सर्व व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

स्ट्रॉबेरीही धोक्यात

स्ट्रॉबेरी व्यवसायाचे भवितव्य पर्यटनावर असते. पर्यटन व्यवसाय बहरला तर स्ट्रॉबेरी उत्पादकांना आर्थिक फायदा होतो. हवामानामुळे शेतकरी कोलमडला असताना पर्यटनही कोलमडल्याने स्ट्रॉबेरी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पर्यटकांच्या वर्दळीवर नियंत्रण आल्याने महाबळेश्वर, पाचगणी या दोन्ही बाजारपेठाही आता थंड झाल्या आहेत.  पुस्तकांच्या गावात भिलारमध्येही शुकशुकाट जाणवत आहे. एप्रिल व मे महिन्यातील आगाऊ आरक्षण सध्या थांबलेले आहे,असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. कोणताही धोका घेण्यास पर्यटक तयार नसल्याने नवीन हंगाम आणि आगाऊ आरक्षणाची प्रतीक्षा करावीच लागेल, असेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पर्यटकांवर प्रतिबंध नाही

महाबळेश्वर येथे येण्यास कोणासही प्रतिबंध करण्यात आलेला नाही. मात्र जागतिक पातळीवर पसरलेल्या या साथीच्या काळात अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा असे सर्वानाच आवाहन करण्यात आले आहे.

– शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 3:30 am

Web Title: corona and rumors hit mahabaleshwar tourism zws 70
Next Stories
1 विदर्भासाठी सौर कृषिपंप योजना अव्यवहार्य
2 जलाशयांमध्ये ५६ टक्के साठा; चांगल्या पावसामुळे यंदा चिंता नाही!
3 सागरी प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर