सोलापूर जिल्ह्यात करोना विषाणूची बाधा झालेला एकही रुग्ण आतापर्यंत आढळून आला नाही. परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगावात द्राक्षबागेत काम करून गावी परतलेल्या एका परप्रांतीय मजुराला करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यात बहुतांश द्राक्षबागांमध्ये उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशातील मजूर काम करतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये परप्रांतीय मजुरांचा वावर द्राक्षबागांमध्ये असताना राज्यात करोना संसर्ग प्रादुर्भाव सुरू होऊ न टाळेबंदी लागू होत असताना हे बहुधा परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळगावी परतले आहेत. यापैकीच ग्वाल्हेरमध्ये पोहोचलेल्या एका मजुराला करोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली. हा मजूर येळेगावातील एका द्राक्षमळ्यात काम करीत होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा येळेगावात धावून गेली आहे. संबंधित करोनाबाधित मजुराच्या संपर्कात येळागावातील कोणकोणत्या व्यक्ती आल्या, त्याची माहिती घेऊन संबंधित सर्व व्यक्तींना वैद्य्कीय तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. आरोग्याधिकाऱ्यांसह पोलिसांची कुमक येळेगावात पोहोचली आहे.

येळेगाव परिसराची नाकाबंदी

येळेगाव शिवारात द्राक्षबागायतदार महादेव पांगळे यांनी बेदाणा शेड  व नेटिंग मशिन सुरू केले आहे. याठिकाणी मध्य प्रदेशातील तरुण काम करीत होते. यातील एक तरुण गावी परतल्यावर करोना पॉझिटिव्ह निघाला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना संदेश प्राप्त झाल्यानंतर बुधवारी महसूल व आरोग्य विभागाने पांगळे यांचे शेड सील केले. संबंधित मजूर ज्या ज्या ठिकाणी गेले, याचा आता शोध सुरू आहे. याठिकाणी असणारम्य़ांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.