वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार देण्याची सुविधा

वसई : करोनाबाधितांवर वेळीच उपचार व्हावे यासाठी पालिकेने आता सर्व नऊ प्रभागांत करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहेत. रुग्णांना रुग्णालयात खाटा आणि त्यांना योग्य उपचार आणि औषधे मिळवून देणे तसेच तसेच घरीच औषधोपचार करणाऱ्या रुग्णांनादेखील कक्षामार्फत वैद्यकीय साहाय्य मिळवून दिले जाणार आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांच्यावर असून दिवसाला सरासरी ७०० ते ८०० रुग्ण आढळून येत आहेत. खासगी ४० आणि पालिकेच्या चार करोना केंद्र आणि रुग्णालयांत करोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. याशिवाय अनेक रुग्ण हे घरात उपचार घेत असतात आणि गृहविलगीकरणात असतात. करोना रुग्णांच्या मदतीसाठी पालिकेचा एकच नियंत्रण कक्ष होता. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे करोना केंद्रावर ताण येत होता. शिवाय समन्वयाचा आणि नियोजानाचा अभाव, अपुरे मनुष्यबळ यामुळे सर्वत्र अनागोंदी माजली होती. रुग्णांना रुग्णालयात खाटा आणि इतर वैद्यकीय सुविधा मिळत नव्हत्या. परिणामयोग्य उपचाराअभावी रुग्ण दगावत होते. पालिकेचे प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाहणी केली असता या त्रुटी दिसून आल्या. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावे यासाठी त्यांनी विशेष योजना तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात एक यानुसार शहरातील नऊ प्रभागांत नऊ करोना नियंत्रण कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असा असेल नियंत्रण कक्ष

शहरातील एकूण नऊ  प्रभागात हा नियंत्रण कक्ष तयार करण्यात येत आहे. प्रत्येक करोना नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. एकूण चार पाळ्यांमध्ये त्यात कर्मचारी असतील. एका पाळीत दोन दूरध्वनीचालक कार्यरत राहणार आहेत. त्यानुसार एका करोना नियंत्रण कक्षामध्ये आठ दूरध्वनीचालक असणार आहेत. तीन करोना नियंत्रण कक्षावर दोन उपायुक्त तैनात करण्यात आले आहे. हे नियंत्रण कक्ष त्या त्या प्रभागातील सर्व खासगी रुग्णालये नियंत्रित करणार आहेत. रुग्णांचा सकारात्मक अहवाल थेट रुग्णांकडे न जाता या नियंत्रण कक्षाकडे जाईल. तेथून रुग्णाला कुठल्या रुग्णालयात ठेवायचे ते नियंत्रण कक्षातील अधिकारी ठरवतील. सौम्य लक्षणे असलेले जे रुग्ण घरी उपचार घेत असतील त्यांना औषधे आणि इतर वैद्यकीय साहाय्य या विभागीय करोना नियंत्रण कक्षामार्फत केला जाणार आहे. प्रत्येक करोना नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या विभागीय नियंत्रण कक्षामुळे प्रत्येक करोना रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवणे, त्यांना योग्य उपचार मिळवून देणे सोपे होणार आहे. प्रत्येक करोना केंद्रावर नोडल अधिकारी म्हणून उपायुक्तांची देखरेख राहणार आहे. २४ तास हा नियंत्रण कक्ष सुरू  राहणार असल्याने नागरिकांना त्याला लाभ मिळणार आहे.

– सतीश लोखंडे, आयुक्त वसई-विरार महापालिका (प्रभारी)