प्रतिजन चाचणी कृती आराखडा प्रभावी; दोन आठवडय़ात ३० टक्के रुग्णसंख्या कमी

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर: पालघर जिल्ह्यतील ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात करोना प्रादुर्भाव पसरत असल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हा व आरोग्य प्रशासनाने तातडीने ही गंभीर बाब लक्षात घेत ग्रामीण भागाचा प्रतिजन चाचणी आराखडा तयार केला. आराखडय़ानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण दुर्गम भागातील जोडलेल्या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे जिल्ह्यची रुग्ण संख्या कमी होत चालली आहे. ही पालघर जिल्ह्यसाठी दिलासादायक बातमी आहे.

पालघर ग्रामीण भागातील बाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या प्रतिजन चाचणी आराखडय़ामुळे वेळीच रुग्ण उपचाराच्या कक्षेत आणल्यामुळे उपचाराशी संबंधित नियोजन करण्यात सोयीचे जात आहे. पालघर जिल्ह्यतील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षेत असणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून ग्रामीण भागातील नागरिकांची प्रतिजन तपासणी केल्यामुळे वेळेआधीच रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे त्यांना वेळीच उपचार मिळत आहेत.

ज्या नागरिकांना लक्षणे नाहीत मात्र जे बाधित आहेत अशा रुग्णांना वेळीच औषधे देऊन गृह विलगीकरणमध्ये ठेवण्यात येत आहे. तर ज्यांना लक्षणे आहेत अशा नागरिकांना विलगीकरण केंद्रांमध्ये उपचारासाठी पाठवले जात आहे. या नियोजनामुळे पालघर जिल्ह्यतील शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या खाटांची उपलब्धता वाढत आहे.प्राणवायूचे योग्य नियोजन होत आहे. तसेच मृत्यूचा दरही या नियोजनामुळे कमी होत चालला आहे, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांनी सांगितले आहे.

महिन्याभरात जिल्हा प्रशासनाने प्रतिजन चाचण्यांचा आराखडा तयार करून नागरिकांची प्रतिजन तपासणी करण्याचे नियोजन युद्धपातळीवर जोमाने सुरू केले.परिणामी एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात वाढत चाललेली रुग्णसंख्या एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात व मे च्या पहिल्या आठवडय़ात कमी झाली. पालघर जिल्ह्यत १२ एप्रिल ते १८ एप्रिल या दुसऱ्या आठवडय़ात जिल्ह्यमध्ये पन्नास टक्कय़ाहून अधिक रुग्ण बाधित होते. प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे हीच रुग्ण संख्या एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात व मेच्या पहिल्या आठवडय़ात कमी होत गेली.२६ एप्रिल ते ५ मे या दरम्यान केलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे तीन आठवडय़ात रुग्ण संख्येचा आलेख सुमारे तीस टक्केने कमी झाला. याच बरोबरीने मृत्यूदर ही १.६८ % वरून ०. ७३ टक्कय़ावर आला.

जिल्ह्यत आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाला विलंब होत असल्याने प्रतिजन चाचण्यांवर भर देऊन त्याद्वारे रुग्ण शोध मोहीम राबवली गेल्याने रुग्ण वाढीचा आलेख खालावत गेला. जिल्हा प्रशासनाने यासाठी मोठा निधी खर्च करून प्रतिजन चाचणी संच मोठय़ा प्रमाणात खरेदी केले तसेच वसई-विरार महापालिकेतूनही उसनवारी तत्त्वावर पालघर ग्रामीण भागासाठी हे प्रतिजन चाचणी संच दिले होते. प्रतिजन चाचणी सकारात्मक आल्यानंतर बाधित रुग्णांवर ताबडतोब उपचारासाठी पुरेसा औषधसाठय़ासाठी जिल्ह्यने मोठा निधी खर्च केला आहे.

जिल्हा व आरोग्य प्रशासनाने वेळीच ही गंभीर बाब लक्षात घेता प्रतिजन चाचणी आराखडय़ाचा घेतलेला निर्णय व त्या दृष्टीने केलेले पुढील नियोजन यामुळे तीन आठवडय़ात जिल्ह्यतील ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी होत चालली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रतिजन चाचणी मोहीम राबविली गेली.त्यामुळे ग्रामीण भागात वेळीच रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविता आले व उपचार करणे शक्य झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

२५ हजार १९० प्रतिजन चाचण्या

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यकक्षा अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आठ तालुके मिळून विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २५ हजार १९० प्रतिजन चाचण्या १६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत करण्यात आल्या. यामध्ये पाच हजार ७९ रुग्ण बाधित असल्याचे आढळले. तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अंतर्गत असलेल्या ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय यामध्ये याच कालावधीत नऊ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमधून २३१९ रुग्ण असल्याचे समोर आले. तर काही खाजगी रुग्णालयांमध्ये ५६८ चाचण्या केल्या गेल्या. त्यापैकी २०९ रुग्ण या कालावधीत आढळून आले.

अनेक तांत्रिक अडचणींमुळे आरटीपीसीआर तपासणी अहवालाच्या विलंबामुळे रुग्णांना वेळेत उपचार देणे सोयीचे नव्हते. प्रतिजन तपासणी कृती आराखडय़ामुळे तातडीने नियोजन करून नागरिकांचा अहवाल विनाविलंब प्राप्त होत असल्याने रुग्णांचे नियोजन व उपचार वेळीच शक्य झाले.

-डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी

चाचण्यामुळे रुग्ण आलेख घसरता

आठवडा              चाचण्या              रुग्ण               टक्केवारी

१२ ते १८ एप्रिल      ७५६७               ३९१९                ५१.८ %

१९ ते २५ एप्रिल    २२४६२              ४८२४                २१.५%

२६ एप्रिल ते ५ मे  २६०२७              ४९६१                 १९.१%

मृत्यूदर

आठवडा                मृत्यू      टक्केवारी

१२ ते १८ एप्रिल         ३७       ०.९४ %

१९ ते २५ एप्रिल         ८१       १.६८%

२६ एप्रिल ते ५ मे       ३६       ०.७३%