निखिल मेस्त्री

समाजमाध्यमांवर करोना विषाणूविषयी पसरत असलेल्या अफवांचा फटका मांसविक्रीला बसला आहे. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिकन आणि मटणाची विक्री थंडवली असून त्याचा परिणाम किमतीवरही झाला आहे. चिकनच्या किमतीत ४० ते ८० रुपयांची घट झाली आहे.

कोंबडी व बोकडाचे मांस खाल्ल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होतो, अशा अफवा गेल्या अनेक दिवसांपासून विविध समाजमाध्यमांवर फिरत असल्याने हे वाचून नागरिकांनी बाजारात मिळणारे मांस घेणे बंद केले आहे. होळीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात मांसाहार केला जातो. मात्र चिकण व मटणची मागणी घटल्याने ऐन होळीत मांस विक्रेत्यांवर संक्रात आली आहे. याउलट नागरिक शाकाहारी सेवनाकडे मोठय़ा प्रमाणात वळल्याचे दिसते. तसेच मासे विक्रीवर याचा परिणाम जाणवला नसला तरी मासे महाग असल्याने सर्वसामान्यांना ते परवडत नाहीत. परिणामी ते शाकाहारी सेवनावर भागवून घेत आहेत.

कुक्कुटपालनावरही याचा मोठा परिणाम जाणवत आहे. सामान्य किरकोळ कोंबडीविक्रेत्यांकडे विक्री होत नसल्याने कुक्कुटपालक संकटात आहेत. त्यामुळे दरही निम्म्याने घटले आहेत. त्यामुळे उत्पादन व पालनपोषण खर्च काढण्यात अडचणी वाढल्या असल्याचे कुक्कुटपालन करणाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचेही ते सांगतात. हॉटेल व्यावसायिक, चायनीज सेंटर आदी ठिकाणाहून ही मागणी कमी झाल्याने हा व्यवसाय मंदीत चालला असल्याचे कुक्कुटविक्रेत्यांचे म्हणणे आहे. मटण व्यवसायावरही याचा परिणाम झाला असून त्याची मागणीही घटली आहे.

कुक्कुटपालकांनी महिनाभरापूर्वी १० हजार कोंबडय़ांची म्हणजेच सुमारे २० हजार किलोची एक तुकडी किरकोळ विक्रेत्यांना सुमारे ९० रुपये प्रतिकिलोपर्यंत विकली होती. मात्र आता मागणी कमी झाल्याने हीच तुकडी निम्म्यावर आली आहे. आता पाच हजार कुक्कुट म्हणजे सुमारे १० हजार किलो इतकेच उत्पन्न घेतले जात आहे. अशी अवस्था सर्वच कुक्कुटपालन केंद्रात आहे. याचबरोबरीने महिन्याभरापूर्वी प्रति किलोला ९० रुपयेपर्यंत भाव मिळत होता. मात्र आता हा भाव २५ रुपये प्रति किलो इतका कमी झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ३२ रुपये प्रतिकिलो मिळणारा भाव सात रुपयांनी घटला आहे. विक्रेत्यांकडे कोंबडी प्रतिकिलो १८० ते २०० रुपये दराने मिळत होती. मात्र आता प्रतिकिलो १२० ते १४० रुपये भाव मिळत आहे.

‘करोनाचा संबंध नाही’

चिकन किंवा मटण खाल्ल्याने या रोगाची लागण होते, असे समाजमाध्यमांवर फिरत असताना जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत याचा करोना रोगाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोंबडी किंवा बोकडाचे मांस शिजवून सेवन करणे आणि त्याच्या मानवी आहारामध्ये वापर करणे याबाबत विविध माध्यमांवर पसरवलेले वृत्त चुकीचे असून यासंदर्भात नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता निश्चिंत राहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

करोनाच्या पसरत असलेल्या अफवांमुळे मटणाच्या विक्रीत कमालीची घट झालेली आहे. याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. करोना व मटणाचा काहीही संबंध नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ  नये.

– नूर मोहम्मद हसन कुरेशी, मटण विक्रेता.

समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या चुकीच्या अफवांचा फटका बसलेला आहे. भीतीने ग्राहक कोंबडीचे मांस घेण्यासाठी धजावत नाहीत. यामुळे दरही कमी झालेले आहेत. त्यामुळे आर्थिक भरुदडही बसत असून मोठे नुकसान होत आहे.

– हर्षल तरे, कोंबडी विक्रेता.

समाजमाध्यमांवर करोनाविषयी विविध माहिती व चित्रफिती समोर येत आहेत. चिकन किंवा मटण खावे की नाही हे समजत नाही. सध्यातरी ते सेवन करणे बंद केले आहे.

– कल्पेश ढेकळे, नागरिक.

समाजमाध्यमांवरील अफवांचा कोंबडीपालनाला मोठा फटका बसला असून जो भाव दीड महिन्यांपूर्वी मिळत होता. त्याच्या निम्मे भावही आता मिळत नाही.

– अनिल राजपूत, कुक्कुटपालक