सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसप्रमाणे खासगी क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेसनाही केंद्र सरकारने विम्याचं सुरक्षा कवच दिलं पाहिजे अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.

“Covid-19 च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसाठी केंद्र सरकारने १२८ कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता भरला आहे. सरकारी रुग्णालयातील २२ लाख वैद्कीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ही रक्कम भरली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी खासगी क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेसनाही ही सुविधा द्यावी. त्यांनी काय घोडं मारलं आहे” असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

आणखी वाचा- नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं – पृथ्वीराज चव्हाण

खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसच्या विम्यासाठी आणखी काहीशे कोटी भरावे लागतील असे ते म्हणाले. त्यांनी या विमा योजनेतील काही त्रुटी सुद्धा दाखवून दिल्या. करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आजारी पडले तर त्यांना कुठलीही भरपाई मिळणार नाही. पण या दरम्यान त्यांचे निधन झाले तर ५० लाख रुपये मिळतील असे चव्हाण यांनी सांगितले.

आणखी वाचा- भारतानं जीडीपीच्या १०० टक्के इतकं कर्ज काढायला हवं – पृथ्वीराज चव्हाण

करोना संदर्भात निर्णय घेताना त्यात एकसमानता असली पाहिजे. सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेऊ नये असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यासाठी त्यांनी रामविलास पासवान यांच्या निर्णयाचा दाखला दिला. खादी ग्रामोद्योगच्या कर्मचाऱ्यांनचा एक महिन्यासाठी विमा काढण्याची घोषणा पासवान यांनी केली आहे. त्याच काय उपयोग आहे, अशा सवंग लोकप्रियतेच्या घोषणा टाळल्या पाहिजेत असे पासवान म्हणाले.