मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मुलाची तक्रार

पारनेर : तालुक्यातील किन्ही येथील करोनाबाधित वृद्धाचा अंत्यविधी तहसीलदार ज्योती देवरे यांनी सवंग प्रसिद्धीसाठी केला असल्याची तक्रार वृद्धाच्या कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री रुग्णालयातील कोविड उपचार केंद्रात, १९ एप्रिल रोजी किन्ही येथील करोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला. नातेवाईक उपस्थित नसल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रशासनाच्या वतीने वृद्धावर अंतिम संस्कार केले. निरोप देऊनही वृद्धाची मुले व कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले नसल्याचे सांगण्यात आले.तहसीलदार देवरे यांच्या संवेदनशीलतेची मोठी चर्चा झाली.

या संदर्भात वृद्धाचा मुलगा रमेश खोडदे याने मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपण नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे वास्तव्यास आहोत.१९ एप्रिल रोजी वडिलांचे निधन झाले असल्याचे कोविड उपचार केंद्रातून विजय आहेर यांनी आपणास कळवले. त्यानंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी भ्रमणध्वनीवरून अंत्यसंस्कारासाठी येण्याबाबत विचारणा केली. आम्ही मुंबई येथून लगेच पारनेरला येण्यासाठी निघतो. आम्ही येईपर्यंत अंत्यविधी करू नका अशी विनंती आम्ही केली. करोनाबाधित मृतदेह फार काळ ठेवणे योग्य नसल्याने आम्ही अंत्यविधी उरकून घेतो असे सांगत तहसीलदार देवरे यांनी भ्रमणध्वनी बंद केला. त्यानंतर पुन्हा तहसीलदार देवरे यांनी दूरचित्र संवादाद्वारे वडिलांचे अंत्यदर्शन घ्या, आम्ही दहा मिनिटांत अंत्यविधी करणार असल्याचे कळवले. आमच्या कुटुंबीयांच्या भावनांचा अनादर करीत तहसीलदार देवरे यांनी केवळ सवंग प्रसिद्धीसाठी अंत्यविधी उरकून घेतला. मुलांनी व कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी येण्यास नकार दिल्याने आपण वृद्धावर अंत्यसंस्कार केल्याचे समाजमाध्यमांवर पसरवले. तशी छायाचित्रे समाजमाध्यमांसह इतर माध्यमातून प्रसिद्ध केली. वडिलांच्या अस्थींची मागणी केली असता तहसीलदार देवरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आमची समाजात, नातेवाइकांमध्ये बदनामी झाली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून तहसीलदार देवरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रमेश खोडदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

करोनाबाधित वृद्धाच्या उपचारादरम्यान कोविड उपचार केंद्राच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कुटुंबीयांशी वारंवार संपर्क साधला होता. वृद्धाच्या मृत्यूनंतरही व्यवस्थापन व महसूल प्रशासनाने संपर्क साधला. मात्र कुटुंबीयांनी प्रतिसाद न देता अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून महसूल व नगर पंचायत प्रशासनाने अंत्यविधी केला. त्या वेळी रमेश खोडदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत प्रशासनाकडे आहे. ?- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर