रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत करोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर पुन्हा ३ टक्कय़ांवर पोचला आहे.

जिल्ह्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे विलंबाने नोंदी होत असल्याने गेले ३ दिवस १२ सप्टेंबरपासूनची मृतांची आकडेवारी संकलित करून दिली जात आहे. त्यापैकी गुरुवारी प्रसिध्दीला दिलेल्या तपशीलानुसार करोनामुळे मृत झालेल्यांमध्ये ६ जणांची भर पडली असून त्यातील ३ रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे.  त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १९३ झाला आहे. तसेच मृत्यू दर ३ टक्कय़ांवर पोचला आहे.

करोनामुळे जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू झालेल्या तिघांमध्ये चिपळूण, रत्नागिरी आणि संगमेश्वरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उर्वरित तिघांमध्ये रत्नागिरीतील ८७ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू १६ सप्टेंबरला, चिपळूणातील ८०वर्षांच्या रुग्णाचा १४सप्टेंबरला, तर दापोलीतील ५२ वर्षांच्या व्यक्तीचा १२ सप्टेंबरला मृत्यू झाला . त्यामुळे मृतांची एकूण संख्या १९३ वर पोचली आहे. तसेच अडीच टक्कय़ांपर्यंत खाली आलेला मृत्यूदर गेल्या आठ दिवसांत पुन्हा ३ टक्कय़ांवर पोचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात गेल्या २४ तासात१२० नवीन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर दुसरीकडे, एकाच दिवसात १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  करोनाबाधितांच्या संख्येत नेहमीप्रमाणे चिपळूण (३३) आणि रत्नागिरी (२९) आघाडीवर आहेत. रत्नगिरी तालुक्यातील २९ रूग्णांपैकी सातजण पावस परिसरातील एकाच कुटुंबातील आहेत. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून प्रत्येक सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरातील बाजारपेठ, महावितरण कार्यालय, पालिका कर्मचारी यांची चाचणी केली. शिवाजीनगर परिसरातील एका बँकेच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चाचणीमध्ये ३ कर्मचारी बाधित असल्याचे आढळून आले आहे.