आतापर्यंत ५० टक्केच प्रवेश; करोनाकाळातील आर्थिक स्थितीचा विद्यार्थ्यांना फटका

निखील मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी निरुत्साह दिसून येत आहे. प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के  विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. जिल्ह्यात यंदा ५३,१६८ विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. करोनामुळे अकरावी प्रवेश लांबणीवर पडले. मात्र, प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अडचणी वाढू लागल्याने ऑनलाइन प्रणालीसह प्रत्यक्ष पद्धतीने (ऑफलाइन) विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली. मात्र, आजवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

करोनाकाळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. काहींना वेतनकपातीला सामोरे जावे लागले. तर काहींना वेतनच न मिळाल्याने पाल्यांना अकरावी प्रवेशासाठी पाठिंबा देता आला नसल्याचे स्पष्ट झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी कुटुंबांच्या आर्थिक स्थितीला हातभार लावण्याचे ठरवले. अशा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही महाविद्यालयांकडून अकरावी प्रवेशासाठी अवाजवी प्रवेश शुल्क आकारणी करून ती भरण्याचा तगादा लावण्यात आल्याने अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी  प्रवेशप्रक्रियाच पूर्ण केली नसल्याचे समजते. जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता ४५ ते ५० हजारांच्या आसपास आहे. आजवर २० ते २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांनी डिप्लोमा, आयटीआय, मुंबई विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला असला तरी  ही संख्या नगण्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या मोठी असल्याचे दिसत आहे.  कुटुंबाच्या अर्थार्जनात हातभार लावण्यासाठी मुली नोकरीकडे वळत असल्याचे चित्र जिल्ह्य़ात पाहायला मिळत आहे.

गेल्यावर्षी पालघर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून सुमारे ४३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मात्र, यंदा अकरावी प्रवेश घेण्यासाठी शासनाने कोणतीही मुदत दिली नसल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असली तरी मोठय़ा प्रमाणात प्रवेशापासून वंचित असलेले सर्व विद्यार्थी अकरावीत प्रवेश याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांंना अकरावी प्रवेश प्रवाहात आणणे आवश्यक आहे.जिल्ह्यात समाधानकारक प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे दिसून येत नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी  सांगितले असले तरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या प्रवेश प्रकियेपासून अनेक कारणांनी दूर आहेत हीच वस्तुस्थिती आहे.

या कठीण काळात शिक्षण संस्थांनी सामाजिक उत्तरदायित्व व नैतिक जबाबदारी लक्षात घेत विद्यार्थ्यांंच्या प्रवेशाबाबत सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करावा.आर्थिक स्थिती नसली तरी प्रवेशापासून वंचित राहू नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे.

-किरण सावे, प्राचार्य सोनोपंत दांडेकर महाविद्यालय

करोनाकाळात आर्थिक स्थिती कोलमडल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांंचा अकरावी प्रवेश जिकिरीचा होत असल्याचे दिसते.विनाअनुदानित विद्यालयाची संख्या जास्त असल्याने त्यांना अनुदान दिल्यास विद्यार्थ्यांंना प्रवेश घेणे सोपे आणि कमी खर्चाचे जाईल.

-सुरेश पाटील, प्रभारी प्राचार्य विक्रमगड कनिष्ठ विद्यालय

प्रवेश शुल्कात सवलत दिल्यानंतरही करोनाकाळात आर्थिक परिस्थिती बिकट बनलेल्या कुटुंबातील विद्यार्थीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी अकरावीच्या प्रवाहाबाहेर जाण्याची भीती आहे.

चंद्रशेखर मोहंते, सचिव चाफेकर महाविद्यालय

पालघरच्या शिक्षण संस्थेत ५० टक्क्य़ांहून अधिक प्रवेश झालेलेच नाहीत.आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाहीत.

-वागेश कदम, कार्याध्यक्ष, जीवन विकास शिक्षण संस्था