चीनमधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचं संकट जगभर पसरले आहे. इराक व इराणमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल सहाशे यात्रेकरू इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. ‘करोना’च्या साथीमुळे इराक व इराणसह तेथील अन्य देशांनी सीमा बंद केल्यामुळे या भारतीय यात्रेकरूंना गेल्या आठ दिवसांपासून तेथेच अडकून पडावे लागले आहे.

इराकची राजधानी बगदाद येथे प्रसिध्द सुफी संत हजरत गौस पाक जिलानींचा दर्गाह तसेच मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमामहुसेन व त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या करबलाच्या युध्दात हौतात्म्य पत्करले तेथील स्थळांचे दर्शन घेण्यासाठी हे यात्रेकरू गेले होते. यापैकी बहुसंख्य यात्रेकरू तेहरान शहरात हॉटेल जिबा येथे गेल्या आठ दिवसांपासून ताटकळत थांबले आहेत.

३१ जानेवारी रोजी हे भाविक तेहेरानमध्ये पोहोचले होते. तेहेरान जवळच्या कुम या शहरात सर्व भाविक अडकून पडले आहेत. ६०० भाविकांमध्ये सोलापुरातील ४४ जणांचा समावेश आहे. ‘करोना’च्या साथीने जगभर पसरत थैमान घालायला सुरुवात करण्यापूर्वीच इराक व इराण आदी देशांनी तेथील सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे आम्ही गेले आठ दिवस एकाच ठिकाणी अडकून पडलो असून भीतीच्या छायेखाली वावरत असताना परमेश्वराकडे प्रार्थना करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आम्हाला तातडीने मायदेशी आणा असं आवाहन या भाविकांनी सरकारला केलंय. कोल्हापूरमधल्या साद टूर्स कंपनीने ही ट्रीप आयोजित केली होती.

इराणमध्ये अडकले भारतातले ३०० मच्छीमार
भारतातले जवळपास ३०० मच्छीमार इराणच्या बंदर-इ-चीरु, चीरुयेह आणि होरोमोझगान प्रांतामध्ये अडकले आहेत. गुजरात आणि अन्य राज्यातील हे मच्छीमार असून त्यांनी फोनवरुन कुटुंबियांकडे मदत मागितली आहे. त्यांनी व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. गुजरातच्या मारोली, भातखाडी, कलगाम, दांडी, नारगोल आणि वलसाडच्या अन्य गावातील हे मच्छीमार आहेत. “गुजरातमधील हे मच्छीमार इराणच्या चीरुमध्ये अडकले आहेत. कोरोनाव्हायरसच्या भितीमुळे तेथील विमानतळ बंद करण्यात आले आहेत” असे पाटकर यांनी सांगितले.