News Flash

कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना करोनाचा फटका

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धसका कलिंगड खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घेतल्याने त्याचा फटका कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

करोनाच्या संभाव्य टाळेबंदीला घाबरून व्यापारी फिरकत नसल्याने तयार झालेले कलिंगड शेतातच कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टाळेबंदीच्या भीतीने व्यापाऱ्यांची पाठ

लोकसत्ता  वार्ताहर

वाडा : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धसका कलिंगड खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घेतल्याने त्याचा फटका कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. करोनाच्या संभाव्य टाळेबंदीला घाबरून व्यापारी फिरकत नसल्याने तयार झालेले कलिंगड शेतातच कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मार्च २०२० पासुन सुरु झालेल्या करोनाच्या महामारीने येथील शेतकरी आधिच उध्वस्त झालेला आहे.  महिनाभरापूर्वी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येथील शेतकऱ्यांनी कलिंगड, टरबुज, पपई अशा विविध प्रकारच्या नगदी पिकांची लागवड केली. ही पिके काढणीस तयार झालेली असतानाच पुन्हा करोनाची दुसरी लाट आल्याने व शासनानेही कडक प्रतिबंध धोरण अवलंबविल्याने त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे.

कलिंगड, टरबुज, पपई ही फळे नाशिवंत असल्याने त्याचा साठा करून ठेवता येत नाही. करोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी कधीही टाळेबंदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टाळेबंदीच्या संभाव्य भितीने व्यापारी फिरकत नसल्याने तयार झालेली ही फळपिके शेतातच कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे कलिंगड पीक तयार झाले आहे, मात्र व्यापारी फिरकत नसल्याने  शेतकरी स्वता गावोगावी फिरून ही फळपिके विक्री करताना दिसत आहेत.

येथील शेतकरी अवकाळी पाऊस, हवामान बदलामुळे रब्बी पिकांचे नुकसान  अशा अनेक  संकटांचा सामना करीत असताना आता करोनाच्या संभाव्य टाळेबंदीला घाबरून व्यापारी फिरकत नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे.  टाळेबंदीची भिती दाखवून व्यापारी कमी दराने कलिंगडची खरेदी करीत आहेत, अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे , अशी खंत  नितीन पाटील  या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 4:44 am

Web Title: corona effect watermelon production farmers income got affected dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मांसाहारींचा पुन्हा हिरमोड
2 मासिक सभेच्या लेखावहीत घोटाळा?
3 अखेर ‘त्या’ लग्न सोहळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश
Just Now!
X