कोल्हापूर : जिल्ह्यात करोनाचा वाढता संसर्ग पाहून जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्ह्यात १९ ठिकाणी कोव्हिड काळजी केंद्रातून २३३८ खाटांची सोय करण्यात आली आहे. त्याचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी ३ नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती रात्री देण्यात आली.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या वाढीचा वेग कायम राहिला असून गुरुवारी आणखी ४६ सकारात्मक रुग्णांची भर पडली. करोना संसर्गाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला असून पुरवठा विभागातील एका अधिकार्याचा अहवाल सकारात्मक आल्याने तो विभाग तीन दिवस बंद ठेवला जाणार आहे.

कोल्हापूर करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. काल एका दिवसात ११२ रुग्ण आढळले, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज जिल्ह्यात आणखी ४६ रुग्ण आढळले. कोल्हापूर शहरानजीक असलेल्या व्यापारी पेठेच्या गांधीनगर तसेच वस्त्रनगरी इचलकरंजी सर्वाधिक प्रत्येकी १० रुग्णांची भर पडली.

मंत्र्यांची शुक्रवारी बैठक

पालकमंत्री सतेज पाटील हे उद्या शुक्रवारी करोनाच्या सद्यस्थिती याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे बैठक घेणार आहेत.