जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणार्‍या नागरिकांचे प्रमाण 65.22 टक्क्यांवर आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात 138 करोनाबाधितांपैकी 45 जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित 90 जणांना यशस्वी उपचाराअंती घरी पाठविण्यात आले आहे. तर रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या तीन जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

देशभरात करोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. करोनावर तत्काळ मात करणार्‍या लसीसाठी वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ संशोधन करीत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याशेजारी असलेल्या सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना उस्मानाबाद ग्रीन झोन होता. मात्र 3 एप्रिलला करोनाचे दोन रूग्ण आढळल्यानंतर तसेच 10 मे नंतर परजिल्ह्यात ये-जा करण्याची सरकारने मुभा दिल्यानंतर जिल्ह्यात एक लाख 30 हजारावर नागरिक बाहेरून आपापल्या गावी परतले आहेत.

पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यात, परराज्यात व्यवसाय, नोकरीसाठी गेलेले नागरिक जिल्ह्यात परतले. मात्र त्यापैकी 10 टक्केच लोक क्वारंटाइन झाले. त्यामुळे करोनाबाधितांचा आलेख वाढतच गेला. जिल्ह्यात गुरुवार, 11 जूनपर्यंत 138 कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी 90 जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 45 करोनाबाधितांवर वेगवेगळ्या कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. करोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.22 टक्के आहे. जिल्हा प्रशासनाने आजवर 12 हजार 257 जणांना क्वारंटाइन केले होते. पैकी पाच हजारावर नागरिकांना 14 दिवसानंतर कुठलेही लक्षणे नसल्याने घरी पाठविण्यात आले आहे. तसेच आजवर दोन हजार 119 संशयित व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. पैकी 138 जणांचा अहवाल सकारात्मक तर एक हजार 830 जणांचा अहवाल नकारात्मक आला असून 58 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.

आरोग्य प्रशासनाकडून वारंवार आवाहन
सध्या पावसाळा सुरू आहे. त्यातच करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण आहे. पावसाळी आजार आणि करोना आजाराचे एकच लक्षणे असल्याने कोणाला करोना झाला? कोणाला नाही? हे कळणे कठीण होणार आहे. बहुतांश नागरिक क्वारंटाइनच्या भीतीने तपासणी करून घेण्याऐवजी घरगुती उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. परंतु ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा नागरिकांच्या आणि त्यांच्यामुळे इतरांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुसर्‍यांसाठी आपली आणि आपल्यासाठी दुसर्‍यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.