करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात वेगाने रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनावर ताण वाढला होता. त्यानंतर हळूहळू स्थिती नियंत्रणात आली आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र करोनाचा समूळ उच्चाटन झालेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत १ जूनपासून काही नियमांत शिथिलता देण्याची घोषणा केली. मात्र ज्या जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्या आहे, अशा जिल्ह्यात निर्बंध कडक करणयाचे आदेश दिले आहेत. आता राज्यातील ग्रामीण भागातील करोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं यासाठी ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे.

करोनामुक्त गावांना बक्षीसं
करोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकुण १८ बक्षीसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.

“आम्ही परीक्षा रद्द केल्या की विरोध, केंद्राने रद्द केल्या तर स्वागत…”

करोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

  • कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत
  • स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे
  • या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांना सहभागी होता येणार आहे.

आम्हीही पैसे देतो, केंद्राने लस द्यावी; खासगी रुग्णालयांच्या लस पुरवठ्यावर मुंबईच्या महापौरांनी ठेवलं बोट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच करोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर करोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.