करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. अशात राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी ठाकरे सरकारने सर्व खर्चांमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून पर्यंत फक्त १५ ते २५ टक्केच निधी खर्च करा अशा सूचना राज्य सरकारने सर्व विभागांना दिल्या आहेत.करोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढतो आहे. अशात आरोग्य विषय सोयींवर खर्च करणं जास्त आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही ३२०० च्या वर गेली आहे. करोनाशी लढणं ही राज्यसरकारशी प्राथमिकता आहे. त्यामुळे इतर सगळ्या खर्चांना कात्री लावण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्याचाही फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसतो आहे. त्यामुळे ३० जून पर्यंत १५ ते २५ टक्केच निधी खर्च करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

रेशनवर स्वस्त धान्य वाटपास सुरुवात

करोनाचं संकट सुरु असल्याने गोरगरीबांना रेशन दुकानांमार्फत धान्य वाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. पालकमंत्र्यांनी या संदर्भात आपल्या आपल्या जिल्ह्यात व्यक्तीशः लक्ष देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्य आणि अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील ७ कोटी नागरिकांनी तीन महिन्यांसाठी २ रुपये प्रति किलो दराने गहू आणि ३ रुपये प्रति किलो दराने तांदूळ रेशन दुकानांवर मिळते आहे. केशरी कार्ड असणाऱ्यांना ८ रुपये किलो दराने गहू आणि १२ रुपये किलो दराने तांदूळ वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे.