राज्यात सध्या केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्याविषयी राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारमधील काही नेतेमंडळींकडून केंद्र सरकारवर लसींचा महाराष्ट्राला अपुरा पुरवठा होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून त्याचा विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. साताऱ्यामध्ये लसीचे सर्व डोस संपले असून त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. त्यामुळे आता साताऱ्यामध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरू होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.

राज्यात ३ दिवसांचाच लसीचा साठा शिल्लक!

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात येत्या ३ दिवसांपर्यंत पुरेल इतकाच करोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती मंगळवारी ६ एप्रिल रोजी सकाळी पत्रकारांना दिली. यावरून राजकीय वाद सुरू झाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकारवर या आरोपांवरून टीका केली आहे. “फक्त मीडियासमोर बोलायचं आणि हात वर करायचे असं न करता राज्य सरकारने केंद्राशी यासंदर्भात चर्चा करावी”, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये लसीचे डोस संपल्यामुळे लसीकरण बंद करावं लागल्यामुळे त्यावरून नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

“….तर तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं,” राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती

साताऱ्यात व्यापक लसीकरण मोहीम

सातारा जिल्ह्यातील ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-१९ लसीकरणाची मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण २ लाख ५६ हजार ४३४ एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याचं विनय गौडा यांनी सांगितलं आहे.

“रोज लसीचा पुरवठा होतोय, मंत्र्यांनी राजकारण बंद करावं”, फडणवीसांनी सरकारला सुनावलं!

पुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा लसीकरण

१ एप्रिल पासून जिल्ह्यामध्ये ४५ वर्षांवरील सरसकट व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले असून जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीने प्रभावी नियोजन करुन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केल्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. लसीची मागणी शासनस्तरावर नोंदविण्यात आली आहे. लस उपलब्ध होताच पुन्हा वेगाने लसीकरणाची मोहीम पुढे सुरु करण्यात येणार असल्याचेही गौडा यांनी सांगितले.