येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या अकोला येथील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची मृत्यूसंख्या आठ झाली आहे.

मूळचा अकोला येथील हा व्यक्ती १४ जून रोजी येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप होता. १५ जून पासून त्याला कृत्रीम जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, यवतमाळ शहर करोनामुक्त झाल्याचा आनंद औटघटकेचा ठरला. १५ मे नंतर शहरात एकही करोनाबाधित रूग्ण न आढळल्याने शहर करोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्याची योजना आखली असतानाच येथील नेताजी मार्केटमधील एका व्यापाऱ्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नेताजी चौक येथील हा ४५ वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून आला परतला होता. त्याला गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताप आणि खोकला असल्याने त्याने सुरवातीला खाजगी रुग्णालयात उपचार केले. मात्र, या रूग्णालयातून केल्यानंतर त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. तेथे त्याची करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा एकदा करोनाच्या रडारवर आले असून हा व्यक्ती राहत असलेला शहरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १९८ झाली. आतापर्यंत १४८ रूग्णांना उपचारानंतर सुट्टी झाली. तर सध्या ४२ सक्रिय पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत.