भटक्या आणि निराधारांसाठी महापालिकेमार्फत चालविल्या जात असलेल्या सावली बेघर निवारा केंद्रातील ५१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे  बुधवारी समोर आले. यामध्ये केंद्रातील चार कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

दोन दिवसापूर्वी सावली निवारा केंद्रातील एका वृद्धाला त्रास होऊ लागताच त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती तो करोनाबाधित असल्याचे समोर आले. यामुळे निवारा केंद्रामध्ये वास्तव्यास असलेले सर्व निराधार, कार्यकर्ते अशा ५७ जणांचे निवारा केंद्रातच अलगीकरण करण्यात आले होते.

त्यानंतर या सर्वाची तपासणी करण्यात आली. बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, निवारा केंद्रामध्ये वास्तव्यास असलेल्या ४७ लाभार्थी बेघर, निराधार आणि ४ कर्मचाऱ्यांसह ५१ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.

सावली निवारा केंद्रातील रुग्ण उपचारासाठी कोव्हिड रुग्णालयात नेणे धोकादायक असल्याने निवारा केंद्रातच त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले असल्याचे नोडल अधिकारी तथा उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. निवारा केंद्रच करोना काळजी केंद्र करण्यात आले असून सर्व बाधित रुग्णांवर याच ठिकाणी उपचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवारा केंद्रातील ५१ रुग्णांसह गणेशनगर कुदळे प्लॉटमधील तीन, सांगलीवाडी येथील एक, वैद्यकीय शिक्षण घेणारा एक विद्यार्थी, मिरजेच्या मंगळवार पेठेतील एक आणि कमान वेस येथील एक अशा ५८ जणांचे बुधवारी करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.